उल्हासनगरच्या गणेश मूर्तींना कल्याणच्या खाडीत विसर्जनाची परवानगी

उल्हासनगरच्या गणेश मूर्तींना कल्याणच्या खाडीत विसर्जनाची परवानगी

यंदाच्या गणेशोत्सवात उल्हासनगरच्या गणेश मंडळांना मूर्ती विसर्जनासाठी कल्याणच्या खाडीत जाण्याची परवानगी मिळाली असल्याची माहिती उल्हासनगर पोलीस परिमंडळ – ४ चे उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री टाऊन हॉल मध्ये पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन, राजकीय पक्ष आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली. याबाबत माहिती देतांना त्यांनी सांगितले की, ”उल्हासनगर शहरातून जाणारी कोणतीही नदी सध्या अस्तित्वात नाही अथवा खाडी अथवा समुद्र देखील नाही. त्यामुळे उल्हासनगर शहराच्या जवळ असलेल्या कल्याणच्या खाडीत गणेश मूर्ती विसर्जनासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी आम्ही ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना केली होती ,त्यांना या विषयाबाबत अवगत केल्यानंतर त्यांनी कल्याण खाडी साठी परवानगी दिली.”

याकारणाकरिता नाकारली होती विसर्जनाची परवानगी 

गेल्या काही वर्षांपासून कल्याण पोलीस आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिका यांनी उल्हासनगरच्या गणेश मूर्तींना कल्याण खाडीत विसर्जनाची परवानगी नाकारली होती, वाहतूक कोंडी, प्रदूषण, कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न अशी अनेक कारणे यामागे देण्यात आली होती. उल्हासनगर मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले की, गणेश मूर्तींचा आकार शक्यतो छोटा असावा, मोठ्या मूर्त्यांमुळे विजेचा धक्का लागून अनेकजण दगवल्याची घटना सुरत मध्ये घडली आहे. उल्हासनगर शहरातील देखील काही वर्षांपूर्वी मोठी गणेश मूर्तीमुळे हायपरटेन्शन वायरचा विजेचा धक्का लागून २ जण दगावले होते. शहरातील रस्ते अतिशय अरुंद आहेत, वाहतूक समस्या आहेत त्यामुळे शक्यतो गणेश मूर्तींचा आकार छोटा असावा, मनपाच्या परवानगी शिवाय सार्वजनिक मंडळांनी मंडप आणि मूर्तीची स्थापना करू नये, कोणत्याही मंडळाला अडथळा येऊ नये म्हणून मनपाने ऑनलाइन परवानगीची व्यवस्था केली आहे.


हेही वाचा- इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट – २०१९

यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे म्हणाले की ”काही ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहे. तेथे ध्वनी प्रदूषण होऊ नये हे समजू शकतो मात्र तेथे शांततेचे पालन करून देखील गणेश मूर्तींची स्थापना केली जाऊ शकते मात्र येथे पोलीस परवानगी नाकारण्यात आली आहे , याबाबत प्रशासनाने विचार करावा.” शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, सुरेश जाधव सहित अनेक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले म्हणने मांडले.

परवानगी मिळाली असली तरी असे केले आवाहन

१४ दिवसांपर्यंत गणेश मूर्तीचे विसर्जन चालू उल्हासनगर शहरात सुरू असते हे अयोग्य असून गणेश मूर्तींचा आकार छोटा करावा आणि प्रदूषण आणि डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन यावेळी पोलीस अधिकारी आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना केले आहे.

या बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त डी डी टेळे, उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवडकर, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने, वाहतूक पोलीस सहाय्यक आयुक्त , मनपा प्रशासनाचे उपायुक्त सोंडे, चारही प्रभागांचे सहाय्यक आयुक्त आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते .

First Published on: August 31, 2019 6:59 PM
Exit mobile version