पितळवाडी आरोग्य केंद्र ‘आजारी’

पितळवाडी आरोग्य केंद्र ‘आजारी’

पितळवाडी आरोग्य केंद्र

तालुक्यातील 42 गावे व वाड्या ज्या पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत, तेच सध्या आजारी पडलेले आहे. वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे केंद्राची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.रुग्णांना आधार ठरणारे हे केंद्र रायगड जिल्हा परिषदेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून आरोग्य विभागाकडून या केंद्राकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या आजारांप्रमाणेच सर्पदंश, विंचूदंश झालेल्या अबालवृद्ध पुरुष-महिला रुग्णांचे प्रमाण प्रचंड आहे.

उपचारासाठी सर्वांना हेच केंद्र एकप्रकारचा आधार असतो. गर्भवती महिलांच्या बाळंतपणासाठी परिसरात याच केंद्रावर नातेवाईकांना अवलंबून रहावे लागते. मात्र गेल्या काही वर्षांपासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची चांगलीच परवड होत आहे. रुग्णालयात 2 कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने अनेक रुग्णांना पोलादपूर अथवा महाड येथे न्यावे लागते. या ओढाताणीत अनेक जण दगावलेही आहेत.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 वैद्यकीय अधिकार्‍यांप्रमाणेच व एका परिचारिकेचे पदही रिक्त आहे. मात्र याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही वरिष्ठ अधिकारी दाद देत नाहीत. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने सध्या विन्हेरे (ता. महाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सुधीर घोडके प्रभारी अधिकारी म्हणून ये-जा करत आहेत.

पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 42 गावे असून, या ठिकाणी सध्या एकच डॉक्टर प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या ठिकाणी वृद्ध, गरोदर माता, बालकांसह इतर रुग्ण येत असतात. यांचे हाल होत असल्याने रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. या जागा लवकरच भरण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
-डॉ. गुलाबराव सोनावणे, तालुका आरोग्य अधिकारी, पोलादपूर

First Published on: July 17, 2019 5:01 AM
Exit mobile version