आशिष शेलारांना वरचं स्थान देण्यासाठी पीयूष गोयलांचा फोटो बॅनरवरून गायब

आशिष शेलारांना वरचं स्थान देण्यासाठी पीयूष गोयलांचा फोटो बॅनरवरून गायब

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासाठी पीयूष गोयल यांचा फोटो बॅनरवरून गायब

आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष. मात्र गेल्या काही वर्षात याच आशिष शेलार यांचा भाजपामधील दबदबा वाढलाय. मुंबई पालिका निवडणूक असो किंवा इतर निवडणुका असो आशिष शेलार हे पक्षात महत्वाची भूमिका बजावताना पहायला मिळत आहेत. कर्नाटक लोटसमध्ये देखील सध्या आशिष शेलार महत्वाची भूमिका बजावत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि विश्वासू नेते म्हणून शेलार यांची ओळख आहे. म्हणूनच त्यांना आज पक्षात वरचे स्थान आहे आणि हे स्थान मुंबई भाजपाच्या बॅनरवर देखील असते. तसा प्रयत्न नेहमी भाजपकडून केला जातो. मात्र आज चक्क बॅनरवर शेलारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बाजूला वरचे स्थान देण्याच्या नादात रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचा चक्क फोटो काढून टाकण्यात आला.

हा आहे आधीचा फोटो ज्यामध्ये रेल्वेमंत्री पीयुश गोयल यांचेही चित्र दिसत आहे.

बॅनरवरील फोटो अचानक झाला गायब

भाजपच्या दादर येथील कार्यालयात आज रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवक्ते माधव भंडारी उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू होण्याआधी स्टेजच्या मागे सुरुवातीला बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे फोटो बॅनरच्या अगदी वर लावण्यात आले होते. तसेच त्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या फोटोच्या खाली आशिष शेलार यांचा फोटो तर त्यांच्या बाजूला गोयल यांचे नाव आणि त्यांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र अचानक हा बॅनर घाईघाईत काढून त्या जागी नवीन बॅनर लावण्यात आला. ज्यामध्ये मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे यांच्या बाजूला शेलार होते. तर ज्यांची पत्रकार परिषद होत आहे ते रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचा फोटो काढून त्यांचे नुसते नाव टाकण्यात आले. त्यामुळे आशिष शेलार यांना बॅनरमध्ये वरचे स्थान देण्यासाठी रेल्वेमंत्र्यांचा फोटो काढला गेला, अशी चर्चा भाजप कार्यालयात होताना दिसली.

हे वाचा – देशात पुन्हा मोदींचे सरकार येईल – पीयूष गोयल

First Published on: January 18, 2019 3:26 PM
Exit mobile version