रायगडकरांचा प्लास्टिक बंदीचा निर्धार !

रायगडकरांचा प्लास्टिक बंदीचा निर्धार !

गांधी जयंतीचे औचित्य साधत संपूर्ण जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचा निर्धार करण्यात आला. बुधवारी यानिमित्त सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात नागरिकांनी उत्स्फूर्त भाग घेतला.खालापूर तालुक्यातील वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता सेवा मोहिमेंतर्गत प्लास्टिक व थर्माकोल बंदीसाठी कडक पाऊले उचलण्यात आली आहेत. सरपंच गौरी गडगे, उपसरपंच सुजाता पाटील, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी गाव प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. वाशिवली ठाकूरवाडी व बोरिवली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत हद्दीतून ‘प्लास्टिक हटाव’चा नारा दिला, तर वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीने शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.

मुरुड येथे वसंतराव नाईक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहिमेला सकाळपासून सुरूवात झाली. यात एनएसएस प्रमुख डॉ. मुरलीधर गायकवाड व डॉ. सुभाष म्हात्रे, डॉ. नारायण बागूल व विद्यार्थी सहभागी झाले होते. पोलादपूर बसस्थानकात चालक व वाहकांनी स्थानकातील कचरा गोळा करून स्वच्छता केली. सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला. नागरिकांसह प्रवाशांनी या सर्वांचे कौतुक केले. नागोठणे येथे ग्रामपंचायतीच्यावतीने प्लास्टिक बंदीचा एल्गार करण्यात आला. गट विकास अधिकारी जाधव यांनी उपस्थितांना प्लास्टिक बंदीची शपथ दिली. यावेळी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच सुप्रिया महाडिक, सदस्य शैलेंद्र देशपांडे व इतर, तसेच ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर उपस्थित होते.

First Published on: October 3, 2019 1:00 AM
Exit mobile version