पुण्यात दीड कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट

पुण्यात दीड कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट

(फोटो प्रातिनिधिक आहे)

पुणे रेल्वे स्थानकात तब्बल दीड कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील रांका ज्वेलर्सच्या कामगाराला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लूट करुन तिथून पळ काढला आहे. याप्रकरणी चार अनोळखी चोरट्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

मुंबईतील काळबादेवी येथील झवेरी बाजारात रांका ज्वेलर्सचे दुकान आहे. या ज्वेलर्समध्ये काम करणारा कामगार अजय होगाडे हे मुंबईहून पुण्याला जात होते. पुण्याला पोहोचल्यानंतर ते फलाटक्रमांक सहाच्या जवळील रिक्षा स्टँडवर गेले. रिक्षा पकडत असताना त्या ठिकाणी चार अनोळखी व्यक्ती येऊन होगाडे यांच्या हातातील दागिन्यांची बॅग खेचण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र होगाडे यांनी त्यांना प्रतिकार केल्यानंतर चोरानी चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. या बॅगमध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचे हिरे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गजबजलेल्या परिसरात चोरी

पुणे हे गजबजलेले शहर आहे. असे असताना देखील पुण्याच्या रेल्वे स्थानकावर चक्क चाकूचा धाक दाखवत लूट केल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने नागिकांची ये-जा असताना देखील चाकूचा धाक दाखवत लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

First Published on: July 28, 2018 12:56 PM
Exit mobile version