पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये ठाण्यात; मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप करणार शक्तीप्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये ठाण्यात; मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप करणार शक्तीप्रदर्शन
ठाणे : राज्यातील सत्तांतरानंतर ठाणे जिल्ह्याला कमालीचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यातून आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवत, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी जिल्ह्याला काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाण्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे. निमित्त आहे ते कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे. हा सोहळा १६ ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याचे बोलले जात असून मोदी काही वर्षांनी पुन्हा एकदा ठाण्यात येणार आहेत. अशाप्रकारे शिंदे गट आणि भाजपने शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाणे महापालिकेला रुस्तमजी गृहसंकुलातील हा भुखंड टाऊन सेंटर या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाला आहे. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याठिकाणी बिझनेस हब सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांची बदली झाली आणि हे प्रकरण थांबले. मधल्या काळात कोरोना वाढल्याने या टाऊन सेंटरच्या ठिकाणी ग्लोबल कोवीड सेंटर सुरु करण्यात आले. त्यानंतर कोरोना कमी झाल्यानंतर याच ठिकाणी किंबहुना येथील जागा कमी पडत असल्याने बाजूच्या जागेवर टाटा मेमोरीअल आणि जितो या संस्थेच्या माध्यमातून कर्करोग रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ३० वर्षाचा करार देखील करण्यात आला आहे.
तसेच यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने येथे कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी जितो या संस्थेच्या वतीने पंतप्रधान विभाग कार्यालयाला पत्र व्यवहार करण्यात आला आहे.
परंतु अजून त्यांच्याकडून काही अंतिम कळविण्यात आलेले नाही. मात्र मोदी येणार असल्याने या जागेची पाहणी देखील पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केल्याची बाब पुढे आली आहे. तसेच याठिकाणी १ लाख नागरीकांची व्यवस्था करण्यासाठीच्या हालचाली देखील सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाची कामे तात्काळ सुरू करावीत, आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांचे निर्देश


First Published on: September 16, 2022 7:13 PM
Exit mobile version