मुंबई दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींच खास मराठीतून ट्वीट, म्हणाले…

मुंबई दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींच खास मराठीतून ट्वीट, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (19 जानेवारी) रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. सत्तांतरानंतर मोदींचा पहिला मुंबई दौरा आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मोदींचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (MMRDA) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. या दौऱ्यादरम्यान महापालिकेच्या प्रकल्पांचेही मोदींच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. परंतु यातील बहुतांश प्रकल्पांचे नियोजन शिवसेनेच्या काळात झाल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

दरम्यान आता पंतप्रधान मोदींनी मुंबई दौऱ्यासंदर्भात स्वत: ट्वीट करुन माहिती दिली आहे. मी उद्या मुंबईत असेन. ३८ हजार कोटी रुपयांचा खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.” असं ट्वीट मोदींनी केलं आहे.

पंतप्रधान मोदींच हे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिट्विट करत महाराष्ट्र आपली आतुरतेने वाट पाहत आहे, मा. पंतप्रधान महोदय! असं म्हटलं आहे.

मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेनेतील फूटीनंतर आता प्रतिष्ठेची बनली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिका ओळखली जाते. त्यामुळे या महापालिकेवरील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने प्रयत्न सुरु केले आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.


PM Modi Mumbai Visit : उद्या मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल, ‘या’ मार्गांचा करा वापर

First Published on: January 18, 2023 9:04 PM
Exit mobile version