दाऊद इब्राहिमच्या मेहुण्याची हत्या करणार्‍या गुंडाला अटक

दाऊद इब्राहिमच्या मेहुण्याची हत्या करणार्‍या गुंडाला अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकर याच्या हत्येतील एक मुख्य आरोपी आणि जामिनावर बाहेर येताच पळून गेलेल्या दयानंद कृष्णा पुजारी ऊर्फ सालियन याला तब्बल २२ वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. दयानंद हा अरुण गवळी टोळीचा गुंड असून तो झांसीमध्ये एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले. अटकेनंतर त्याचा ताबा नागपाडा पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. १९९२ साली नागपाडा येथे इब्राहिम पारकर याची गवळी टोळीच्या चार गुंडांनी हत्या केली होती. याच हत्येप्रकरणी दयानंद पुजारीसह इतर सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत नंतर दयानंदला जामिन मंजूर झाला होता.

जामिनावर बाहेर येताच तो मुंबईतून पळून गेला होता. तो सतत खटल्याच्या सुनावणीसाठी गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. तसेच त्याच्या अटकेचे आदेश गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना दिले होते. या आदेशानंतर त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच दयानंद हा कांजूरमार्ग येथील साईनगर परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या पथकातील संजय सुर्वे, सतोष जाधव, दयानंद मोहिते यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून दयानंद पुजारीला अटक केली. दयानंद हा गेल्या बावीस वर्षांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. याच दरम्यान तो झांसी येथे पळून गेला होता. तिथे असलेल्या एका हॉटेलमध्ये तो कुक म्हणून काम करीत होता. त्याच्याविरुद्ध नागपाडा आणि खेरवाडी पोलीस ठाण्यात हत्येसह हत्येचा प्रयत्न आणि घातक शस्त्रे बाळगणे अशा गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नागपाडा पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

First Published on: December 24, 2018 9:51 PM
Exit mobile version