संमेलनस्थळासह पर्यटन ठिकाणी पोलीस बंदोबस्त

संमेलनस्थळासह पर्यटन ठिकाणी पोलीस बंदोबस्त

नाशिक शहरात होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनानिमित्त देशभरातून साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये येणार असून, संमेलनस्थळासह नाशिक शहर आणि जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देणार आहेत. संमेलनस्थळासह पर्यटनस्थळी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व लुटमारीची घटना घडू नयेत, यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.

नाशिक शहरात होणारे साहित्य संमेलन अनेक वर्षे स्मरणात रहावे, यासाठी आयोजकांकडून जय्यत तयारी सुरु आहे. संमेलनानिमित्त नाशिकचे नाव जगभर जावे, यासाठी संमेलन आयोजक, जिल्हा प्रशासनासह पर्यटन विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. संमेलनास आलेल्या साहित्यिक आणि रसिकांना सहकुटुंब नाशिक दर्शन करता यावे, पर्यटनासाठी कोणत्या ठिकाणी जावे, याची माहितीपत्रकाव्दारे दिली जाणार आहे. त्यामुळे संमेलनासह पर्यटनस्थळी गर्दी होणार आहे. या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, लुटमार होऊ नये, यासाठी नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. नाशिक शहरातील पर्यटनस्थळी पोलीस ठाणेनिहाय पोलीस ठेवला जाणार आहे. शिवाय, संमेलनस्थळी आडगाव पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. संमेलन आराखड्यानुसार संमेलनस्थळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्यासोबत पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावीत, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, म्हसरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरतकुमार सूर्यवंशी, आडगाव पोलीस ठाण्याचे इरफान शेख यांच्यासह कर्मचार्‍यांनी पाहणी केली. यावेळी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आयोजकांना काही सूचना केल्या आहेत.

First Published on: November 16, 2021 9:10 PM
Exit mobile version