Porn Case: पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल

Porn Case: पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अडचणी अजून वाढल्या आहेत. पॉर्नोग्राफिक फिल्म रॅकेटच्या (Pornographic Case) प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनी वियान एंटरप्रायजेसचा आयटी प्रमुख रायन जॉन थॉर्प आणि इतर आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. १ हजार ४६७ पानांच्या आरोपपत्रात ४३ साक्षीदारांची जबाब आहेत, ज्यात महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम १६४ अन्वये नोंदवलेल्या पाच व्यक्तींचे जबाब समाविष्ट आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास इच्छुक तरुणींना ब्रेक देण्याचे बहाण्याने अश्लिल चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणाऱ्या पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार ४ फेब्रुवारी २०२१ रोजी मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा यांनी पर्दापाश करून मालवणी पोलीस ठाणे गु.र.क्र. १०३/ २०२१ गुन्हा नोंद करून ५ आरोपींना अटक केलं होतं. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण ०९ आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध १ एप्रिल २०२१ रोजी मा. न्यायालयात एकूण ३५२९ पानांचे दोषारोपपत्र दाखल करून कलम १७३ (८) फौ. दं.प्र. सं. अन्वये तपास सुरू होता.

नमूद पॉर्न केसमधील मुख्य सूत्रधार यावा मालमत्ता कक्षामार्फत तपास सुरु असताना तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब आणि जप्त कागदपत्रांवरून हॉटशॉटस अॅपचा सूत्रधार राज कुंद्रा हाच असल्याचे आढळून आले. मा. न्यायालयाकडून सर्व वॉरन्ट प्राप्त करून राज कुंद्रा याच्या अंधेरी येथील कार्यालयाची झडती घेतली असता त्यामध्ये पोर्न फिल्मबाबत बरेच पुरावे प्राप्त झाले. त्याआधारे रिपु सुदन कुंद्रा उर्फ राज कुंद्रा व त्याचे विआन इंडस्ट्रीज कंपनीतील आय.टी. हेड रायन जॉन यॉर्प यांना नमुद गुन्ह्यात १९ जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आलेली आहे.

नमूद गुन्ह्याच्या तपासात अटक २ आरोपींनी यापूर्वी अटक केलेले आरोपींशी संगनमत करून फिल्म लाईनमध्ये स्ट्रगल करणाऱ्या नवोदित तरुणींच्या कमकुवत आर्थिक परिस्थिती व असहायत्तेचा गैरफायदा घेवून त्यांचे अश्लिल चित्रीकरण केलं. सदरचं अश्लिल व्हिडिओज विविध वेबसाईट्स तसंच मोबाईल अॅप्लीकेशन्सवर अपलोड केले. या अश्लिल व्हिडीओजची सबस्क्रिप्शन द्वारे विक्री करून अश्लिल मजकूर ऑनलाईन प्रसारीत केले आहेत.

सदर अश्लिल व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन चार्जेस घेवून गैर मार्गाने लाखो रुपयांची कमाई केली. नमूद बळीत महिला यांना नाममात्र मोबदला किंवा काही वेळेस काहीही मोबदला न देता त्यांची फसवणूक केली आहे. तसंच नमूद गुन्हयातील महत्वाचा पुरावा असलेले व्हॉटस्अप चॅट व ई-मेल स्वत:च्या मोबाईल फोन आणि लॅपटॉपमधून राज कुंद्राने नष्ट केले आहेत. यास्तव अटक आरोपी रिपु सुदन कुंद्रा उर्फ राज कुंद्रा व रायन जॉन थॉर्प तसंच आरोपी अरविंदकुमार श्रीवास्तव, सिंगापूर व परदिप बक्क्षी, लंडन यांच्याविरुद्ध मुख्य महानगर दंडाधिकारी, ३७ वे न्यायालय, किल्ला कोर्ट, मुंबई यांच्या न्यायालयात १५ सप्टेंबर २०२१ रोजी एकूण १४६७ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अशाप्रकारे नमूद गुन्ह्यात एकूण १३ आरोपीविरुद्ध एकूण ४९९६ पानांचे दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास कलम १७३ (८) फौ.दं.प्र. सं. अन्वये चालू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली.

 

First Published on: September 15, 2021 10:20 PM
Exit mobile version