चड्डी-बनियान टोळीनंतर आलीये पीपीई कीट गँग; दरोड्याचा कोरोना पॅटर्न

चड्डी-बनियान टोळीनंतर आलीये पीपीई कीट गँग; दरोड्याचा कोरोना पॅटर्न

सीसीटीव्हीमध्ये चोरी करताना कैद झालेले चोर

‘चड्डी-बनियान टोळीचा दरोडा’ अशी बातमी तुम्ही हमखास ऐकली असेल. भारताच्या अनेक राज्यात अधूनमधून अशा एखाघ्या टोळीने दरोडा टाकल्याची बातमी कधी ना, कधी ना आपल्या कानावर पडत असतेच. पण जसा काळ बदलतो, तसा चोरी करण्याचा पॅटर्न देखील बदलत जातो. सध्या चोरट्यांनी कोरोना पॅटर्नने दरोडा टाकायला सुरुवात केली की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे. सोलापूर येथे शनिवारी काही चोरट्यांनी चक्क पीपीई कीट घालून शहरातील सहा मोबाईल दुकाने फोडले. या दुकानांतून किंमती सामानांची चोरी करुन त्यांनी तब्बल ५० लाखांचा ऐवज लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोलापूर शहरात चार चोरांनी शनिवारी रात्री चांगलाच धुमाकूळ घातला. एका पांढऱ्या गाडीतून चार चोर आले होते. पाचवा चोर हा वाहनचालक होता, तो गाडीतून खाली उतरला नाही. तर चार पैकी दोघांनी पीपीई कीट परिधान केले होते. तर इतर दोघांनी एकसारखे कपडे घातले असून चेहरे झाकले होते. मार्केटमधील सीसीटीव्हीमध्ये या चौकडीचे चोरी करण्याचे कृत्य कैद झाले आहे. शनिवारी रात्री दीड वाजल्यापासून ते पहाटे ३ वाजेपर्यंत चोरट्यांनी सहा दुकाने फोडली.

सदर व्हिडिओ सह्याद्री या वेब चॅनेलवर प्रदर्शित झालेला आहे.

या दरोड्यात चोरट्यांनी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांना लक्ष्य केले. सर्वात आधी बोरामणी चौक येथील युनिक एन्टरप्रायझेस या मोबाईलच्या दुकानांतून ४० ते ५० मोबाईल आणि रोख रक्कम चोरली. त्यानंतर गायत्री कॉम्प्युटर्स, अक्षय एंटरप्रायझेस, ज्योती टेलिकॉम, जयसेल मल्टी ब्रँड आणि एस.जी. सेल्स या दुकानांत देखील दरोडा टाकला. सर्व दुकानांमधून जवळपास २०० मोबाईल, रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरीला गेले आहेत.

अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आता हळुहळु व्यावसायिक आपला उद्योग सुरु करु लागले आहेत. मात्र चोरट्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिकांना दहशतीत टाकले आहे. पीपीई किट घालून जर चोरी करत असतील तर त्यांना ओळखणे तर दूरच राहिले पण इतर पुरावे देखील गोळा करणे पोलिसांसमोर कठीण होऊन बसले आहे.

First Published on: August 22, 2020 5:46 PM
Exit mobile version