RSS देशातला सर्वात मोठा आतंकवादी – प्रकाश आंबेडकर

RSS देशातला सर्वात मोठा आतंकवादी – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांची टीका

आर्थिक पडझडीवरचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात हिंसा पसरवत आहे. त्यासाठी विद्यापीठांना लक्ष्य करण्यात येत आहे. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात झालेला हल्ला त्या कटाचा पूर्वनियोजित भाग होता, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना देशातला सर्वात मोठा आतंकवादी आहे, असे ते म्हणाले. मोदी सरकारला आर्थिक पातळीवर सर्वत्र अपयश आलेले आहे. दारुडा जसा घरातल्या वस्तू विकून गुजराण करतो, त्याच मार्गाने मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातल्या एकएक कंपन्या विकून कारभार हाकत आहे. हे सर्व अपयश उघड होवू नये म्हणुन संघ-भाजपला देशात यादवी घडवायची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

जनसंघ, संघ आणि भाजप या संघटनांचा विस्तार हिंसेच्या मार्गाने झालेला आहे. संघ, भाजप संघटनेत हिंसा अंगभूतच आहे, असे ते म्हणाले. तसेच जेएनयु मधील विद्यार्थ्यांचा लढा हा विद्यापीठ कँपसपुरता मर्यादीत नसून चातुवर्ण्यची प्रतिमागी पद्धत आणि भारतीय संविधानाची पुरोगामी व्यवस्था या दोन व्यवस्थेमधील तो संघर्ष असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला.

देशात संघ, भाजप भितीचे वातावरण निर्माण करत आहे. मात्र ही भिती झुगारुन आपण उभे राहिले पाहिजे. अर्बन नक्षलवादी संज्ञा संघ-भाजपने जन्माला घातली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच देशातला सर्वात मोठा आंतकवादी आहे. कारण संघाकडुन कार्यकर्त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असून हे सर्व पोलीस दफ्तरी नोंद आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.

First Published on: January 9, 2020 7:33 PM
Exit mobile version