‘भाजप देखील सरकारचाच एक घटक, राज्यात आम्हीच विरोधक’!

‘भाजप देखील सरकारचाच एक घटक, राज्यात आम्हीच विरोधक’!

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी राज्यामध्ये ‘भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीचं आव्हान नसून फक्त वंचित बहुजन आघाडीचं आव्हान आहे’, असं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, आता त्याच धर्तीवर वंचित बहुजन आघाडीचेच सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी विधान केलं आहे. ‘राज्यात रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून फक्त आम्हीच विरोधक आहोत. भाजप तर सत्ताधाऱ्यांचाच एक घटक आहे. नाहीतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत नक्की काय घडलं, हे जाहीर करावं’, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यापासून काहीसे चर्चेतून दूर गेलेले प्रकाश आंबेडकर २६ डिसेंबरला दादरमध्ये होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली.

फाईल फोटो

२६ डिसेंबर रोजी सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या विधेयकांना विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून दादर टीटी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी राज्यातल्या महाविकास आघाडीविषयी भूमिका मांडली.

‘भाजपनं खुलासा करावा’

‘राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत जाणं हे समजू शकतं. पण काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये का सहभागी झाली?’, असा सवाल यावेळी आंबेडकरांनी विचारला. तसेच, ‘१४४-१४४ जागा लढवण्याची ऑफर मी काँग्रेसला दिली होती. त्यावर त्यांच्याकडून कोणतीही ऑफर आली नाही’, असं देखील आंबेडकर म्हणाले. ‘आम्ही राज्यात एकमेव विरोधी पक्ष आहोत. राष्ट्रवादीसोबत काय चालू आहे, यावर भाजपने खुलासा केल्यानंतरच ते सत्ताधारीमध्ये आहेत की विरोधात आहेत हे स्पष्ट होईल. राष्ट्रवादीमुळे भाजप सत्ताधाऱ्यांचाच एक भाग आहे’, असं ते म्हणाले.

‘…तर हे सरकार ५ वर्ष टिकेल’

‘राज्यसरकार ५ वर्ष टिकावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी आधी भूमिका घ्यायला हवी की शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीवर अवलंबून आहे की काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेवर अवलंबून आहे. खरंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेची गरज आहे. हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी सत्ता केली तर हे सरकार ५ वर्ष टिकेल’, असं देखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी नमूद केलं.

First Published on: December 25, 2019 6:58 PM
Exit mobile version