अखेर जठारांची तलवार म्यान; अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला मागे

अखेर जठारांची तलवार म्यान; अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला मागे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी अखेर आपली तलवार म्यान केली असून, अपक्ष निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यामुळे प्रमोद जठार नाराज झाले होते. तसेच नाणार समर्थनार्थ वेळ पडली तर अपक्ष देखील निवडणूक लढेन असा निर्धार त्यांनी केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रमोद जठार यांनी आपली तालवार म्यान करत, युती धर्म पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार असल्याची माहिती जठार यांनी दिली आहे. तसेच युतीचा धर्म पाळणार असून, सर्व कार्यकर्ते प्रचारात सामील होतील, असे देखील जठार यांनी सांगितले.

राणेंची डोकेदुखी वाढली

दरम्यान, प्रमोद जठार यांनी आपली बंडाची तलवार म्यान केल्यामुळे नारायण राणे यांची डोकेदुखी वाढल्याचे पहायला मिळत आहे. जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रमोद जठार अपक्ष उभे राहिले असते तर, भाजपाची बरीचशी मते त्यांना मिळाली असती. याचा निलेश राणे यांना फायदा झाला असता. मात्र, आता भाजपा-शिवसेना कोकणात देखील वाद मिटल्याने राणेंच्या स्वाभिमान पक्षाची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाणारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या प्रमोद जठार यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता जठारांनी माघार नक्की का घेतली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.

First Published on: March 27, 2019 1:15 PM
Exit mobile version