…अजून पोरकटपणा, हळूहळू मॅच्युरिटी येईल; प्रणिती शिंदेंची रोहित पवारांवर खोचक टीका

…अजून पोरकटपणा, हळूहळू मॅच्युरिटी येईल; प्रणिती शिंदेंची रोहित पवारांवर खोचक टीका

मागील काही दिवसांपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. सोलापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी सध्या पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील ही मागणी केली आहे. परंतु सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सोलापूर लोकसभेचा उमेदवार काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा? या चर्चेला सुरुवात झाली आहे. दरम्यान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.

राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया विचारली प्रणिती शिंदे म्हणाल्या की, कोण रोहित पवार? रोहित पवारांची ही पहिलीच टर्म आहे, काही जणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांवर निशाणा साधला.

सोलापूर लोकसभेच्या जागेवरुन आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहणार की, राष्ट्रवादी लढणार याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करत आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ मागू, असं म्हटलं होतं. मात्र, यावेळी प्रणिती शिंदेंनी पोरकटपणा म्हणत रोहित पवारांवर थेट पलटवार केला आहे.

प्रणिती शिंदे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. महिला आमदारच सुरक्षित नसतील तर, सर्वसामान्य महिलांना सुरक्षा कशी मिळणार, असा सवालही शिंदेंनी यावेळी उपस्थित केला.


हेही वाचा : वंदे भारत ट्रेनमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला मिळणार अधिक गती – पंतप्रधान नरेंद्र मोदी


 

First Published on: February 10, 2023 5:19 PM
Exit mobile version