प्रशांत किशोर कॉंग्रेस प्रवेश करणार ? मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत

प्रशांत किशोर कॉंग्रेस प्रवेश करणार ? मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानंतर आता एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. येत्या काळात प्रशांत किशोर हे कॉंग्रेस प्रवेश करणार असल्याच्या चर्चा या भेटीनंतर होऊ लागल्या आहेत. आगामी वर्षांमध्ये येऊ घातलेल्या निवडणूकांसाठी प्रशांत किशोर यांना कॉंग्रेसकडून संधी देण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या राज्य आणि देश पातळीच्या निवडणूकीत पक्षाची रणनिती निश्चित करण्याची जबाबदारी कॉंग्रेस पक्षाअंतर्गत मिळणार असल्याचे कळते. राहुल गांधी यांची भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्या भेटीचा अर्थ काढू नये अशी प्रतिक्रियाही प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

फक्त पंजाब किंवा उत्तर प्रदेशच्या निवडणूकीसाठीची मर्यादित जबाबदारी न देता एक मोठी जबाबदारी कॉंग्रेस पक्षाअंतर्गत प्रशांत किशोर यांना देण्यात येणार असल्याचे वृत्त एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्षाला येत्या २०२४ च्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाला तयारीने उतरण्यासाठीची ही जबाबदारी प्रशांत किशोर यांना देण्यात येणार असल्याचे कळते. पण याआधीच पश्चिम बंगाल निवडणूकीनंतर प्रशांत किशोर यांनी आपल्याला राजकारणाच्या क्षेत्रातून बाहेर पडायचे आहे असे संकेत दिले होते. मी जे सध्या करतोय, ते मला यापुढे करायचे नाही असे विधान प्रशांत किशोर यांनी केले होते. मी आतापर्यंत पुरेसे काम या क्षेत्रासाठी केले आहे. म्हणूनच आता मला थोडासा ब्रेक घेण्याची वेळ आली आहे. तसेच काही तरी नवीन करण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले होते. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही निवडणूकांमध्ये त्यांनी आखलेली रणनिती ही यशस्वी ठरली होती.

प्रशांत किशोर राजकारणात येणार का ? या प्रश्नावर प्रशांत किशोर यांनी मी अयशस्वी राजकारणी असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळेच मला पुन्हा मागे जाऊन नक्की काय केले हे पहायचे आहे हे स्पष्ट केले. पुन्हा एकदा आसाम येथे जाऊन चहाच्या मळ्यात शेती करण्याचाही मानस त्यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवला होता.

प्रशांत किशोर यांचा आतापर्यंतचा कॉंग्रेससोबतचा अनुभव तसा थोडासा खटके उडालेला असाच आहे. प्रशांत किशोर यांनी याआधीही कॉंग्रेस पक्षासोबत २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत झालेल्या युतीच्या माध्यमातून काम केले होते. पण ही युती अपयशी ठरत त्यावेळी भाजपचा विजय झाला. कॉंग्रेससोबत काम करताना एकट्या पंजाबमध्ये प्रशांत किशोर यांची रणनिती यशस्वी ठरलेली आहे. उत्तर प्रदेशच्या अपयशानंतर त्यांनी कॉंग्रेसच्या काम करण्याच्या पद्धतीवर टीका केली होती. पश्चिम बंगालच्या निवडणूकीनंतरही त्यांनी १०० वर्षे जुन्या अशा कॉंग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. या पक्षामध्ये काम करण्यासाठी मुक्त असे वातावरण नसल्याचा आरोप प्रशांत किशोर यांनी केला होता. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले होते.


 

First Published on: July 14, 2021 3:41 PM
Exit mobile version