मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण प्रवीण दरेकर यांना अटक आणि जामिनावर सुटका

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण प्रवीण दरेकर यांना अटक आणि जामिनावर सुटका

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी शुक्रवारी मुंंबै बँकेतील गैरव्यवहारासह बोगस मजूरप्रकरणी दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. अटकेनंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची 35 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली.

प्रवीण दरेकर यांना यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मार्च महिन्यात धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच त्यांची पोलिसांकडून दोन वेळा चौकशी करून जबानी नोंदविण्यात आली होती. याच प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांना तत्काळ जामिनावर सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

या आदेशानंतर शुक्रवारी प्रवीण दरेकर यांना त्यांच्याविरुद्ध असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची 35 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. यावेळी प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करताना माझ्यावर सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान आपल्याला पोलिसांकडून त्रास देण्याचा प्रयत्न झाला, मात्र न्यायालयाने आपली बाजू ऐकून आपल्याला दिलासा दिला होता. त्यामुळे केवळ कायदेशीर प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आपण पोलीस ठाण्यात जात असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: May 14, 2022 6:00 AM
Exit mobile version