मविआत आलबेल नाही, शहांना जे सुचवायचं ते त्यांनी सुचवलं; दरेकरची सूचक प्रतिक्रिया

मविआत आलबेल नाही, शहांना जे सुचवायचं ते त्यांनी सुचवलं; दरेकरची सूचक प्रतिक्रिया

मविआ सरकार दारुड्यांची काळजी घेतेय, वाईन विक्रीच्या निर्णयावर प्रवीण दरेकरांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बंद दाराआड गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. त्यातच अमित शहा यांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया येत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अमित शहा यांच्या वक्तव्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा यांना जे सुचवायचं होतं ते त्यांनी सुचवलं, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत चालू नसल्याचं म्हटलं. ठाकरे सरकारमध्ये आलबेल नसून घालमेल बाहेर येत आहे. नशिबाच्या जोरावर फारकाळ सरकार चालवता येत नाही, असं दरेकर म्हणाले. यावेळी त्यांनी अमित शहा यांच्या शरद पवार भेटीवर केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. अमित शहा आमचे मोठे नेते आहेत. त्यांना जे काही सुचवायचं होतं, ते त्यांनी सुचवलं, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

सर्व सार्वजनिक करता येत नाही

अमित शहांनी शरद पवार यांच्यासोबतच्या गुप्त बैठकीवर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सर्व गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत, असं औचक विधान अमित शहा यांनी केलं. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला. मात्र, अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

First Published on: March 28, 2021 4:41 PM
Exit mobile version