एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन : दरेकरांची शरद पवारांवर टीका; काय आहे कारण?

एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन : दरेकरांची शरद पवारांवर टीका; काय आहे कारण?

मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली भेट म्हणजे नौटंकी आहे, अशी टीका आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

ते म्हणाले, एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमदेवारांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या आज निर्माण झालेल्या नाहीत. आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे एमपीएससी उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता केवळ विरोधाला विरोध करायचा. राजकारणासाठी विरोध करायचा, याला नोटंकीचं म्हणतात. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली. हा प्रकार का झाला याचा विचार त्यांनी करायला हवा, असा टोलाही दरेकर यांनी हाणला.

एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी करत ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी पुणे येथे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. शरद पवार यांनी या उमेदवारांची मंगळवारी भेट घेतली. रात्री अकरा वाजता पवार हे आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करुन यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही शरद पवार यांनी उमेदवारांना दिले. त्यावरुन भाजपचे आमदार दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एमपीएससी उमेदवारांची भेट घेतली. एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा निर्णय एमपीएससीलाही कळवण्यात आलेला आहे. तरीही नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा होणार असतील तर न्यायालयात जावे लागेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गेल्या महिन्यातही एमपीएससी विद्यार्थ्यांनी पुणे येथे आंदोलन केले होते. एमपीएससी परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम सन २०२५ लागू करावा, अशी मागणी उमेदवारांनी केली होती. सन २०२५ पासूनच एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम लागू होईल, असे आश्वासन राज्य शासनाने उमेदवारांना दिले होते. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र एमपीएससीच्यावतीने काही परीक्षांची घोषणा करण्यात आली. या परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहेत. त्याविरोधात उमेदवारांनी पुन्हा आंदोलन छेडले आहे.

First Published on: February 22, 2023 2:12 PM
Exit mobile version