‘ट्रम्प स्वागताची लगीनघाई’, हे गुलामगिरी मानसिकतेचे लक्षण – सामना

‘ट्रम्प स्वागताची लगीनघाई’, हे गुलामगिरी मानसिकतेचे लक्षण – सामना

मोदी ट्रम्प भेट

गुलाम हिंदुस्थानात इंग्लंडचा राजा किंवा राणी येत असत तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लगीनघाई होत असे. जनतेच्या तिजोरीतून हा मोठा खर्च केला जात असे. मि. ट्रम्प असो किंवा प्रेसिडंट ट्रॅम्प यांच्याबाबतीत हेच घडत आहे व आपल्याला गुलाम मानसिकतेचे लक्षण या लगीनघाईतून दिसत असल्याची टीका सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजप सरकारवर करण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना बादशहा असे संबोधत ते येत्या आठवड्यात हिंदुस्थान भेटीवर येत असल्याने सुरू असलेल्या लगीनघाईवर सामनातून बोचरी टीका करण्यात आली आहे. बादशाह प्रे. ट्रम्प हे काय खातात, काय पितात, त्यांच्या गाद्या – गिरद्या, टेबल, खुर्च्या, त्यांचे बाथरूम, त्यांचे पलंग, छताशी झुंबरे कशी असावीत यासाठी केंद्र सरकार बैठका, सल्लामसलती करत असल्याचे दिसते असाही उल्लेख अग्रलेखात करण्यात आला आहे.

गरिबी छुपाव

ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या देशात येत आहेत. त्यांच्या स्वागतात कोणतीही कसर राहू नये. शेवटी हा राजकीय शिष्टाचार आहे. केम छो ट्रम्पने ते खुश होतील, पण ट्रम्प यांना दिल्लीत न उतरवता थेट अहमदाबादेत उतरवून केंद्र सरकारला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे ? असाही सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे. अहमदाबाद दौरा आटोपल्यानंतर झोपडपट्ट्या लपवणाऱ्या भिंती पाडणार काय ? हे प्रश्न आहेत. मागे गरिबी हटाव या घोषणेवरून बरीच टिंगलटवाळी झाली होती. त्याच घोषणेचे रूपांतर आता गरिबी छुपाव या योजनेत झालेली दिसते. नव्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली आहे ? असाही सवाल करण्यात आला आहे.

ट्रॅम्प हिंदुस्थानात पधारल्यामुळे रूपयाची घसरण होणार नाही किंवा भिंतीपलीकडे गुदमरलेल्या गरीबांच्या जीवनात बहार येणार नाही. गरीबी छुपावचे या योजनेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतुद केली आहे काय ? संपूर्ण देशात अशा भिंती उभारण्यासाठी अमेरिका हिंदुस्थानला कर्ज देणार आहे काय ? असाही सवाल सामनातून करण्यात आला आहे.

First Published on: February 17, 2020 1:38 PM
Exit mobile version