पंतप्रधानांची महाराष्ट्राला शाबासकी!

पंतप्रधानांची महाराष्ट्राला शाबासकी!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांवर विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने टीका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल महाराष्ट्राला शाबासकी दिली. मोदी यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली. त्यावेळी मोदी यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, अशा शब्दात महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले.

यावेळी ठाकरे यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती करताना विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र कसे नियोजन करीत आहे, त्याविषयी ठाकरे यांनी माहिती दिली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

राज्याचे स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्याची मागितली परवानगी
केंद्र सरकारने विकसित केलेले कोविन हे अ‍ॅप सुरळीत चालत नसल्याने लसीकरणात अडथळे निर्माण होत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारचे स्वत:चे अ‍ॅप विकसित करण्याची परवानगी मागितली आहे. या मुद्याकडे ठाकरे यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.

First Published on: May 9, 2021 4:20 AM
Exit mobile version