टास्क फोर्समधील प्रधान सचिव पॉझिटिव्ह

टास्क फोर्समधील प्रधान सचिव पॉझिटिव्ह

दक्षिण मुंबईतील यशोधन इमारतीत अनेक आयएएस अधिकार्‍यांचे वास्तव्य आहे. याच इमारतीत राहणार्‍या एका प्रधान सचिवाला गुरूवारी करोनाची लागण झाल्याचे समजल्याने एकच खळबळ उडाली. (छाया ः दीपक साळवी)

महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईवर करोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. मुंबईच्या कानाकोपर्‍यात करोनाचे रुग्ण आढळत असताना आता मंत्रालयाच्या गेटपर्यंत करोनाचा व्हायरस पोहोचला आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन केलेल्या कोविड टास्क फोर्समधील एका प्रधान सचिव दर्जाच्या सनदी अधिकार्‍याला आता कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील एक आयपीएस अधिकारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे आता अधिकारी वर्गामध्ये घबराट पसरली आहे.

मंत्रालयाच्या कोविड टास्क फोर्समध्ये १८ हून अधिक सनदी अधिकारी कार्यरत असून त्यांच्याकडे आरोग्य विभाग, महापालिकांमध्ये समन्वय, स्थलांतरीत मजूरांचा विषय असे अनेक विषय देण्यात आलेले आहेत. टास्क फोर्सचे अधिकारी हे कायम मंत्रालयातील सर्व वरीष्ठ अधिकार्‍यांशी संपर्कात असतात. सध्या करोनाचा संसर्ग झालेले अधिकारी दक्षिण मुंबईतील यशोधन नामक इमारतीमध्ये वास्तव्यास आहेत. त्या इमारतीमध्ये इतर अनेक सनदी अधिकारी देखील राहतात. त्यामुळे या इमारतीमधील इतर अधिकार्‍यांना देखील क्वारंटाईन करणार का? यावर लवकरच निर्णय होईल.

टास्क फोर्सच्या निमित्ताने हे अधिकारी अनेक वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्‍यांना भेटत असल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळेच आता त्यांच्या भेटी, बैठकांबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. एकूणच आता करोनाचे संकट हे राज्याच्या कारभार्‍यांपर्यंत येऊन पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वीच एक कॅबिनेट मंत्री देखील करोना पॉझिटिव्ह आढळला होता. आयपीएस अधिकारी देखील पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे करोनाचे संकट आता मंत्रालयाच्या पायर्‍यापर्यंत पोहोचल्याचे म्हटले जात आहे.

 

 

First Published on: May 8, 2020 6:55 AM
Exit mobile version