रेल्वेच्या कारशेडमध्येच खासगी तेजस फोडली

रेल्वेच्या कारशेडमध्येच खासगी तेजस फोडली

tejasa express

मुंबई ते अहमदाबाद ही दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस गुजरातच्या रेल्वे कारशेडमध्ये फोडण्यात आली. काही अज्ञातांनी या नव्या तेजस एक्स्प्रेसच्या काचा फोडल्या आणि सिट तोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे ही तेजस एक्स्प्रेस सुरू होण्यास प्रवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही तोडफोड रेल्वेच्या खासगीकरण विरोधात झाल्याची चर्चा आहे.

लखनौ ते दिल्ली दरम्यान देशाची पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस सुरू झाली. एका महिन्यात जवळपास ७० लाखांचा नफा एक्स्प्रेसने मिळवला. त्यामुळे खासगी तेजस एक्स्प्रेस यशस्वी ठरली आहे. भारतीय रेल्वेने दोन महिन्या अगोदरच दोन्ही तेजस एक्स्प्रेस आयआरसीटीसीला सुपुर्द केल्या. पहिली तेजस एक्स्प्रेस ५ ऑक्टोबरला सुरू झाली तर 9 नोव्हेंबर 2019 ला मुंबई ते अहमदाबाद दरम्यान दुसरी तेेजस एक्स्प्रेस आयआरसीटीसी सुरू करण्याचे नियोजन होते. याची तयारीसुध्दा आयआरसीटीसीने पूर्ण केली होती. दुसरी तेजस एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेच्या अहमदाबादमधील तातडीया कारशेडमध्ये उभी करण्यात आली होती.

मात्र काही अज्ञातांनी या नव्या कोर्‍या तेजस एक्स्प्रेसच्या काचा फोडल्या आणि गाडीच्या सीटची तोडफोड केली आहे. यात चार ते पाच डब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र रेल्वेच्या कारशेडमध्ये खासगी तेजसची तोडफोड झाल्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध रेल्वेकडून सुरू आहे. मात्र अद्यापही यासंबंधी गुन्हा दाखल केलेला नाही. रेल्वेच्या खासगीकरणाविरोधात हे कृत्य झाल्याची माहिती नाव न छापण्याचा अटीवर आयआरसीटीसीच्या एका अधिकार्‍याने दिली. या संबंधी ‘आपलं महानगर’ने पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी माहिती घेऊन तुम्हाला उद्या सांगतो असे सांगितले.

खासगीकरणामुळे तेजस फोडली
या दोन तेजस एक्स्प्रेस चालवण्याचे अधिकार रेल्वेने आपली उपकंपनी असलेल्या ‘इंडियन रेल्वेज केटरिंग अँड टूरिझम’वर सोपवली आहे. खासगीकरणाच्या दिशेने रेल्वेचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचारी संघटनांना काही दिवसांपासून रेल्वेच्या खासगीकरणाविरोधात आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी वंदे भारत एक्स्प्रेस आणि पहिली तेजस एक्स्प्रेच्यासुद्धा काचा फोडण्यात आल्या होत्या. आता तर चक्क कारशेडमध्ये उभ्या असलेल्या दुसर्‍या तेजस एक्स्प्रेसची तोडफोड करण्यात आली आहे.

डिसेंबर महिना उजाडणार
मुंबई ते अहमदाबाद अशा धावणार्‍या खासगी तेजस एक्स्प्रेसची तोडफोड केल्यामुळे या गाडीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तेजस एक्स्प्रेच्या काचा आणि सिट तोडल्यामुळे त्या बदलण्यासाठी काही वेळ जाणार आहे. त्यामुळे या तेजस एक्स्प्रेसला थोडा विलंब होत आहे. मात्र डिसेंबर महिन्यात ही गाडी सुरू होईल, असा आशा आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.

First Published on: November 15, 2019 7:01 AM
Exit mobile version