खासगी वाहनांचा महाड बस स्थानकाला विळखा!

खासगी वाहनांचा महाड बस स्थानकाला विळखा!

खासगी वाहने महाड बस स्थानकात

येथील एसटी बस स्थानकामध्ये खासगी वाहनचालक बिनदिक्कतपणे दुचाकी, चारचाकी वाहने उभी करीत असल्याने संपूर्ण परिसराला या वाहनांचा विळखा पडत आहे. त्यातच बस स्थानकात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वावर अधिक वाढला आहे. त्यांच्याकडून धूम स्टाईलने मोटरसायकल चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील हे मध्यवर्ती बस स्थानक आहे. बसेस व प्रवाशांची सतत वर्दळ असणार्‍या या बस स्थानकाला वाहनांचा विळखा पडत असल्यामुळे तेथे बकाल स्वरुप आले आहे. स्थानक इमारतीच्या चहुबाजूने दुचाकी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. यातील अनेकजण आपली मोटरसायकल आठवडाभर लावून जात असल्याचे एसटी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. बस स्थानकातील खासगी वाहनांच्या पार्किंगमुळे अधिकारी, कर्मचारीदेखील त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकवेळा शहर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. या स्थानकातील रायगड थांब्यासमोर, तसेच मुंबई, पुणे थांब्यासमोर दुचाकींचे अनधिकृत पार्किंग केले जाते. विन्हेरे थांब्यासमोर तर आता दुचाकीबरेाबर चार चाकी वाहनेदेखील उभी केली जात आहेत.

वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे स्थानकात येणार्‍या बसना मोठा अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी पोलीस चौकी देखील बांधण्यात आली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तेथे पोलीस कर्मचारी ठेवला जात नाही. त्यामुळे बस चालकांसह प्रवाशांनाही स्थानकात असुरक्षित वाटू लागले आहे.

बस स्थानकात अनधिकृतरित्या वाहने उभी करून ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवासी सोडावयास येणार्‍या वाहनांव्यतिरीक्त इतर वाहने अस्ताव्यस्त उभी करून ठेवली जातात. तरुणही स्थानकाच्या आवारातून बेफामपणे वाहन चालवतात. यावर उपाय म्हणून पे अ‍ॅण्ड पार्किंगचा प्रस्ताव पाठविला आहे.
-ए. पी. कुलकर्णी, आगार व्यवस्थापक

First Published on: July 31, 2019 4:24 AM
Exit mobile version