उदयनराजेंच्या मिरवणुकीत चोरट्यांचा डल्ला

उदयनराजेंच्या मिरवणुकीत चोरट्यांचा डल्ला

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले

सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मिरवणूक काढली होती. यावेळी जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी तब्बल ३८ तोळे सोने व २० हजार रुपयांची रोकड असा एकूण ११ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरत चोरट्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या खिशांवर डल्ला मारला. उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे जिल्ह्यातील आजीमाजी आमदार यांच्यासह जिल्ह्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गांधी मैदानात जमले होते.

उदयनराजेंची राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मिरवणूक काढली होती. यासाठी सातारा शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी कडक बंदोबस्त करण्यात आला होता. मिरवणुकीत जमलेल्या गर्दीत चोरट्यांनी अनेकांना धक्का देत गळ्यातील सोन्याची चैन व खिशातील रोकड लंपास केली. गर्दीमध्ये चेन व पॉकेट खाली पडले असावे, म्हणून कार्यकर्त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, अनेक जण अशा प्रकारे शोधाशोध करत असल्याचे पाहून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अनेकांनी मिरवणूक अर्धवट सोडून थेट पोलीस ठाणे गाठले. यावेळी ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात असल्याने तक्रार घ्यायची कोणी असा प्रश्न निर्माण झाला होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनेकांनी ठाण्यासमोर गर्दी केली होती.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडून तक्रारी घेण्यात आल्या. शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकूण २६ तोळे सोने व ७ हजार रुपये रोकड मिळून ६ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तर सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार कमानी हौद ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान, सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकूण १३ जणांनी तक्रारी दिल्या. पोलिसांकडून रॅली मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

First Published on: April 4, 2019 4:00 AM
Exit mobile version