घोड्याच्या लिदीपासून गॅसची निर्मिती !

घोड्याच्या लिदीपासून गॅसची निर्मिती !

माथेरान येथे पर्यटकांना पॉइंट्ससह इतरत्र फिरण्यासाठी घोडा हेच प्रमुख साधन असून, स्वाभाविक त्यांची संख्याही मोठी असल्याने लिद सर्वत्र पडते. त्यामुळे अस्वच्छतेबरोबर पर्यावरणालाही हानी पोहोचते. ही गंभीर समस्या सोडविण्यात आता नगर पालिकेला यश आले आहे. त्यासाठी घोड्यांच्या लिदीपासून गॅस निर्मिती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
शहरात 462 प्रवासी वाहन घोडे आणि 180 मालवाहू घोडे आहेत. या घोड्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर जागोजागी लीद पडत असल्याने नगर पालिकेने लीद उचलणारे कर्मचारी नेमले. मात्र या लिदीची योग्य विल्हेवाट लागत नसल्याने ती नगर पालिकेसाठी मोठी डोकेदुखी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन कर्तव्यदक्ष अशी ख्याती असलेले मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी या लिदीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. लिदीच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळविण्यासाठी फवारणीचा मार्ग अवलंबून शहर दुर्गंधीमुक्त केले. पण दररोज पडणारी लिद मोठी समस्या होऊन बसली होती.

कोकरे यांनी लिदीपासून बायोगॅसचा प्रयोग अंमलात येऊ शकतो का, याची चाचपणी सुरू केली. हा प्रयोग यशस्वी होताच येथील निसर्गऋण बायोगॅस प्रकल्पात लिदीसाठी स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात आणली. घोड्यांचे तबेले, घोडे उभे असणारे नाके येथून पालिका कर्मचार्‍यांमार्फत लीद गोळा करून ती बायोगॅस प्रकल्पात आणली जाते. विशेष म्हणजे गॅस तयार करून त्याचा वापर महत्त्वाच्या रस्त्यांवर वीज पुरवठा करण्यासाठी केला जात आहे. याचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

अशी होते प्रक्रिया..
गोळा केलेली लिद पाण्याच्या टाकीत टाकून मिश्रण केले जाते. यातून गवत बाजूला केले जाते. चांगल्या प्रकारे मिश्रण झाल्यानंतर ते प्री डायजेस्टरमध्ये सोडले जाते. त्यावर मिश्रणाची पुन्हा प्रक्रिया होऊन ते मेन डायजेस्टरमध्ये सोडले जाते. तेथे मिश्रण 24 दिवस राहून त्यातून तयार होणारा गॅस डोममध्ये जातो आणि त्यातून हळूहळू तो बलूनमध्ये जमा होण्यास सुरुवात होते.

सहाशेच्या आसपास घोडे असल्याने साहजिकच घोड्यांच्या विष्टेचा अर्थात लिदीची समस्या असल्याने त्याची विल्हेवाट लावणे हे आव्हान होते. यासाठी लिदीपासून गॅस प्रक्रिया होते का, याचा प्रयोग करून पाहिला.तो यशस्वी झाल्यानंतर स्टेनलेस स्टीलची प्री डायजेस्टरसाठी 12 फूट उंच टाकी बनवून तेथून प्रक्रिया सुरू केली. एकावेळी दीड टन लिद यात राहते. त्यामुळे माथेरान लिदीच्या समस्येपासून मुक्त होणार आहे.
-रामदास कोकरे, मुख्याधिकारी

लिदीपासून गॅस बनविण्याची प्रक्रिया मुख्याधिकार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे योग्य असल्याने आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत लिदमुक्त माथेरान करण्याचे ठरविले. आता लिदीपासून गॅस प्रक्रिया सुरू केली आहे. लिदीमध्ये उष्णता अधिक असल्यामुळे गॅसचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील वीज पुरवठ्या व्यतिरिक्त हॉटेलवाल्यांना गॅस पुरवठा करून पालिकेला उत्पन्न मिळविता येईल का, यावर विचार सुरू आहे .
-प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा

First Published on: November 8, 2019 1:23 AM
Exit mobile version