महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन सुरू

महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन सुरू

महाड तालुका महसूल कर्मचारी वर्गातील तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांनी सोमवारी काळी फित लावून आंदोलन केल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. येथील जमीन फसवणूक प्रकरणात शहर पोलीस निरीक्षकांनी पदाचा गैरवापर करीत मंडळ अधिकार्‍याला अटक केल्याचा आरोप तलाठी संघटनेने करून हे आंदोलन सुरू केले आहे.

पोलीस ठाण्यात जमीन फसवणूक प्रकरणाबाबत एक गुन्हा दाखल असून, यामध्ये मंडळ अधिकारी सुग्राम जामसिंग सोनावणे यांना अटक करण्यात आली आहे. महसूल कर्मचारी राजेंद्र उभारे यांचे नावदेखील समाविष्ट केल्या प्रकरणी महाड आणि पोलादपूर तलाठी संघाच्यावतीने सोमवारी दुपारी काळी फित लावून काम बंद केले होते. याबाबत रायगड, महाड आणि पोलादपूर तलाठी संघाने उप विभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदनदेखील दिले.

महाड आणि पोलादपूर तलाठी संघाने पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करीत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सणस यांनी पदाचा गैरवापर करून सोनावणे यांना अटक केल्याचा आरोप केला आहे. उप विभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर संघटनांनी ठिय्या मारला आहे.

First Published on: November 15, 2019 1:10 AM
Exit mobile version