वाहने ढकलत इंधन दरवाढीचा निषेध

वाहने ढकलत इंधन दरवाढीचा निषेध

इंधन दराने शंभरी गाठल्याने वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने वाहने ढकलत दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. गेल्या सव्वा वर्षापासून कोरोना रोगाने संपूर्ण जगाला संकटात घेरले आहे. अशा कठीण परिस्थितीत सामान्य जनता जीवन जगत असतांना रोजच्या दैनंदिन वापरात येणार्‍या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. घरगुती गॅस चे दर आठशे रूपयांपेक्षा अधिक तर पेट्रोल चा दर प्रति लिटर शंभर, तर डिझेल चा दर ९० रूपयांवर पोहचले आहेत. गेल्या महिन्याभरात पेट्रोल ३ तर डिझेल ४.५० रूपयांनी महागले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकी नंतर अवघ्या २२ दिवसांत १३ वेळा पेट्रोल व डिझेल किमतीत दरवाढ झाली. पाच महिन्यांपूर्वी ९० रूपये प्रति लिटर मिळणारे पेट्रोल आता शंभरी पार गेले आहे. या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही मोठया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईने जनता होरपळली असून याचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वात सातपूर येथे पेट्रोल पंपावर मोपेड ढकलून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सातपूर विभागीय अध्यक्ष अपेक्षा अहिरे, शहर उपाध्यक्ष मिनाक्षी गायकवाड, संगिता अहिरे, चिटणीस सुजाता कोल्हे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

First Published on: May 26, 2021 8:40 PM
Exit mobile version