MPSCच्या उमेदवारांनी गैरवर्तन केल्यास कायदेशीर कारवाई होणार, लोकसेवा आयोगाचा निर्णय

MPSCच्या उमेदवारांनी गैरवर्तन केल्यास कायदेशीर कारवाई होणार, लोकसेवा आयोगाचा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसेवा आयोगाचे उमेदवार आणि अथवा आयोगाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने गैरवर्तन, असभ्य, असंस्कृत आणि अश्लील भाषेचा वापर केला तर त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे. भरती प्रक्रिया किंवा इतर निर्णयामुळे लोकसेवा आयोगाचे उमेदवार आणि भावीलोकसेवक प्रभावित होत आहे. यामुळे संताप व्यक्त करताना शिवीगाळ आणि गैरवर्तन होत असल्याचे समोर आलं आहे. या गोष्टीला आळा घालण्यासाठी लोकसेवा आयोगाकडून आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/संभाषण इत्यादीसंदर्भात करावयाच्या कारवाईबाबतचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे.
लोकसेवा आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये असे म्हटलं आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेसंदर्भात एखाद्या विशिष्ट पध्दतीने निर्णय घेण्याबाबत अथवा निर्णय न घेण्याबाबत कोणत्याही प्रकारे प्रयत्न केला तर तो आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल. तसेच अशा प्रकरणांबाबत आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल असे लोकसेवा आयोगाच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीवर तसेच निर्णयांवर नाराज उमेदवारांकडून जाहीर टीका करण्यात येते. आयोगावर टीका-टिपणी करत असताना शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या भावी लोकसेवकांकडून सार्वजनिक सभ्यतेचे भान ठेवून संसदीय व सुसंस्कृत भाषा शैलीचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. परंतु, काही उमेदवार/व्यक्‍ती यांच्याकडून विविध प्रसारमाध्यमांवर आणि सोशल मीडियावर मत व्यक्‍त करताना किंवा दूरध्वनीवरुन संवाद साधताना असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेचा वापर करण्यात येत असल्याची बाब आयोगाच्या प्रकर्षाने निदर्शनास आली आहे.

आयोगास निदर्शनास आलेल्या उपरोक्‍त बाबींची आयोगाच्या कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात येणार असून उमेदवार आणि व्यक्तीवर संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीपासून संबंधिताला कायमस्वरुपी अथवा काही विशिष्ट कालावधीसाठी प्रतिरोधित करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट, महागाई भत्त्याबाबत घोषणेची शक्यता

First Published on: December 30, 2021 3:14 PM
Exit mobile version