आता पुण्याचं विमानतळसुद्धा जगात भारी

आता पुण्याचं विमानतळसुद्धा जगात भारी

पुणे विमानतळ (सौजन्य - दी इंडियन एक्सप्रेस)

पुणेकर नेहमीच सर्वांना सांगत असतात की, आमचं शहर जगात भारी आहे. आमची तुळशीबाग, आमची मिसळ, आमची मस्तानी इत्यादी जगात भारी आहे. आता या यादीत अजून एका गोष्टीचा समावेश झाला आहे. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगात सर्वात उत्तम विमानतळांच्या यादीत तिसरे स्थान मिळाले आहे. त्यामुळे आमचं विमानतळ जगात भारी म्हणणारे पुणेकर आपल्याला येत्या काळात पहायला मिळतील. प्रवासी सुविधांबाबत पुण्याच्या विमानतळाचा गौरविण करण्यात आला आहे. एअरपोर्ट काऊन्सिल ऑफ इंटरनॅशनलच्या (एसीआय) कॅनडा येथे झालेल्या परिषदेत जगभरातील प्रवासी सेवेत सर्वोत्तम असलेल्या विमानतळांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ५० लाख ते दीड कोटी प्रवासी संख्या असलेल्या विमानतळांच्या यादीत पुणे विमानतळाने जगभरातील तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे पुण्यासोबत या यादीत कोलकात्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळही संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे.

एअरपोर्ट काऊन्सिल ऑफ इंटरनॅशनलने नुकताच विमानतळांबाबतच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला. यावेळी एसीआयने कोट्यवधी लोकांची मते नोंदवून घेतली होती. एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी (एएसक्यू) अॅवॉर्ड्स २०१८ अंतर्गत हे रेटिंग गुरूवारी जाहीर केले. १७६ देशातील १९५३ विमानतळांबाबत यावेळी सर्वेक्षण करण्यात आले होते. टर्मिनलपासून विमानतळाला जाण्याचा मार्ग, सुरक्षा विषयक तपासणी, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, विश्रांतीगृह, दुकाने, रेस्टॉरंट अशा विविध ३४ विभागानुसार या विमानतळांवर सर्वेक्षण केले गेले.

यामध्ये भारतातील पुणे, लखनऊ, चेन्नई, कोलकाता , अहमदाबाद आणि इंदूर या सहा विमानतळांचा समावेश करण्यात आला होता. २०१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये ५० लाख ते दीड कोटी प्रवासी क्षमतेच्या विमानतळ गटामध्ये हैदराबाद दुसऱ्या स्थानी होते. तर, कोची, कोलकाता आणि पुणे ही तिन्ही विमानतळ संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर होती. यंदाही पुण्याने तिसरे स्थान कायम ठेवले आहे. देशात सर्वाधिक विमान उड्डाणांमध्ये पुणे विमानतळ नवव्या स्थानावर आहे.

 

First Published on: September 14, 2018 4:33 PM
Exit mobile version