पुण्यातील रिक्षावाल्याने लग्नासाठी जमवलेल्या पैशातून केलं मजुरांसाठी अन्नदान

पुण्यातील रिक्षावाल्याने लग्नासाठी जमवलेल्या पैशातून केलं मजुरांसाठी अन्नदान

पुण्यातील अक्षयचे कौतुकास्पद काम

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन झालं. याकाळात एका विषाणूने जगाला वेठीस धरल्याचं आपण पाहिलं. तशी माणुसकीची विविध रुपही आपण पाहिली. पुण्यातील एका रिक्षा ड्रायव्हरच्या माणुसकीचा अनुभव सध्या अनेक मजूर आणि निराधार लोक घेत आहेत. या पठ्ठ्याचे लग्न लॉकाऊनमुळे पुढे ढकलले गेले आहे. त्यामुळे लग्नासाठी जमवलेल्या दोन लाखामध्ये याने मजूर, निराधार यांना आधार देण्यासाठी अन्नदानात हे पैसे खर्च केले. या रिक्षावाल्याने जे केलं आहे, ते धाडस भल्या भल्या धनदांडग्यांनाही जमणार नाही.

अक्षय कोठावळे असे या दानशूर रिक्षावाल्याचे नाव आहे. फक्त मजूर आणि निराधारांना आधार देऊन अक्षय थांबला नाही. तर त्याने वृद्ध आणि गर्भवती महिलांना आपल्या रिक्षातून दवाखाना ते घर असा मोफत प्रवास करण्याची सुविधा दिली आहे. तसेच आपल्या रिक्षाच्या माध्यमातून कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठीही जनजागृती केलेली आहे.

अक्षयने त्याच्या मित्रांचा ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून तो लग्नासाठी बचत केलेल्या पैशांचा विनियोग करतो. अक्षयचा ग्रुप दररोज जवळपास ४०० लोकांचे जेवण तयार करतो आणि आपल्या रिक्षातून शहरातील रस्ते आणि इतर ठिकाणी असलेल्या मजूर आणि निराधार लोकांना हे अन्नवाटप केले जाते. एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना अक्षय म्हणतो की, “या कामातून मला आनंद मिळतो. दुसऱ्यांना मदत करण्यात एकप्रकारेच समाधान आहे.”

“रिक्षा चालवण्याचे काम करत असताना मी लग्नासाठी २ लाख रुपये जमा केले होते. २५ मे रोजी लग्नाची तारिख ठरली होती. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे मी आणि माझ्या होणाऱ्या बायकोने समंतीने लग्न पुढे ढकलले. मी रस्त्यावर अनेक लोकांना पाहतो. एक वेळचे अन्न घ्यायलाही त्यांच्याकडे पैसे नाहीत, जगण्यासाठी त्यांची धडपड मला पाहवत नाही. त्यामुळे मी आणि माझ्या मित्रांनी या निराधार लोकांसाठी काहीतर करण्याचा निर्णय घेतला.”

माणसाची खरी कसोटी ही संकटकाळात लागते, ते उगाच नाही बोलत. अक्षय सांगतो की, त्याने लग्नासाठी जमवलेले पैसे या मदतीसाठी खर्च करण्याचे ठरवले. तसेच त्याच्या मित्रांनीही काही पैसे जमा केले. या पैशातून कम्युनिटी किचनची उभारणी केली. याठिकाणी चपाती, भाजी बनवली जाते. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मजूर थांबले आहेत, तिथे जाऊन त्यांना जेवण दिले जाते. पुण्यातील संगमवाडी आणि येरवाडा परिसरात मालधक्का चौकात अनेक मजूर, निराधार लोक बसलेले असतात. तिथे माझ्या रिक्षातून आम्ही जेवण घेऊन जातो आणि त्यांना वाटतो.

सध्या अनेक लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. त्या जोरावर ३१ मे पर्यंत हे कार्य सुरु ठेवण्याचा मानस अक्षयने बोलून दाखवला.

First Published on: May 18, 2020 4:11 PM
Exit mobile version