फ्रीजचा दरवाजा उघडताच स्फोट; मात्र यामुळे वाचले सहा जणांचे प्राण

फ्रीजचा दरवाजा उघडताच स्फोट; मात्र यामुळे वाचले सहा जणांचे प्राण

अकरा वर्षीय नातवाने आजोबासह कुटुंबातील सहा जणांचे प्राण वाचवल्याचे समोर आले आहे. रात्री पावणे दोनच्या सुमारास तहान लागल्यामुळे नातू पाणी पिण्यासाठी उठला. त्याने फ्रिजचा दरवाजा उघडताच स्फोट होऊन आग लागली. प्रसंगावधान दाखवत तो धावत गेला. सर्वांना जाग आली. तातडीने सर्व जण राहत्या घराच्या बाहेर पडल्याने प्राण वाचले. मॅक्स पॉल चाबुकस्वार, असं अकरा वर्षीय नातवाचे नाव आहे. मध्यभागी असलेल्या किचनला मोठी आग लागली होती. आगीत तब्बल दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना कासारवाडी येथील सागर हाईट्स येथे घडली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यानी आग आटोक्यात आणली.

आणि अनर्थ टळला 

सविस्तर माहिती अशी की, पुणे-मुंबई जुना महामार्गावर असलेल्या सागर हाईट्स इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. ही घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली. शाळेला सुट्टी लागल्याने कदम यांचा नातू, मुलगी आणि जावई आले होते. रात्री उशीरा सर्व जण गाढ झोपेत होते. नातू मॅक्स पॉल हा रात्री उशिरा पाणी पिण्यासाठी झोपेतून उठून फ्रीजकडे गेला, त्याने फ्रीजचा दरवाजा उघडताच स्फोट झाला. त्याने क्षणांचा विलंब न करता तो आई वडिलांसह आजोबांकडे गेला. त्यांनीही घरात न थांबता घरातील विजेचे मुख्य बटन (स्विच) बंद करून बाहेर पडले. घरात मोठी आग लागली होती. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. तुकाराम नगर, भोसरी येथील अग्निशमन केंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, सोबतच एक देवदूत दाखल झाली. अरुंद रस्त्यामुळे वाहन इमारतीपर्यंत घेऊन जाण्यास प्रचंड अडचणी आल्या, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. गंभीर बाब म्हणजे इमारतीच्या पाचव्या मजल्यावर अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली नव्हती.

सर्व साहित्य जळून खाक

अर्धातास शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या यश आले. दरम्यान, घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले, असून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. फ्रीज कॉम्प्रेसरमधून गॅस गळती झाल्यामुळे आग लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळं नागरिकांनी रात्रीच झोपताना गॅस गळती तर होत नाही, ना याची खात्री करावी, असं आवाहन अग्निशमन अधिकारी यांच्याकडून करण्यात आलं आहे.

First Published on: May 19, 2019 1:29 PM
Exit mobile version