शरद पवारांच्या पुणे मेट्रो ट्रायलवर आक्षेप

शरद पवारांच्या पुणे मेट्रो ट्रायलवर आक्षेप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यातील मेट्रोची ट्रायल घेतली. यावर आक्षेप नोंदवत मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. एवढेच नव्हे, तर पुण्यातील आमदार आणि खासदारांनीही कंपनीवर हक्कभंग प्रस्ताव दाखल करावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पुण्यातील फुगेवाडी मेट्रो स्थानकाला अचानक भेट दिली. मेट्रो कामाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी फुगेवाडी स्थानकातून मेट्रोतून उभ्याने प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.पवारांच्या या पाहणी दौर्‍यावर भाजपने जोरदार टीका केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना पवारांच्या मेट्रो ट्रायलवर घणाघात केला. पुण्याच्या मेट्रो प्रकल्पातून फेरफटका मारुन पवारांना या प्रकल्पाचे श्रेय लाटायचे आहे का? असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. पुणे-पिंपरीमधील स्थानिक आमदार, खासदारांना कोणतीही माहिती न देता शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मेट्रो ट्रायल करण्यात आली. पवारांच्या बाबत आमच्या मनात आदर आहे. परंतु अशा प्रकारे घाईत मेट्रोची ट्रायल घेण्याची गरज काय? यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे का? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारले.

एवढी घाई का?
पुण्यातील मेट्रो प्रकल्प ११ हजार कोटी रुपयांचा आहे. यामध्ये केंद्र सरकारने ८ हजार कोटी रुपयांचा वाटा उचलला आहे. तसेच कंपनीला गॅरंटी दिली आहे. पुणे महानगरपालिकेने ३ हजार कोटी रुपये दिले आहेत. राज्य सरकारचाही त्यात वाटा आहे. या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम उशिरा घेण्याचे ठरवण्यात आले होते. तेव्हा शरद पवारांनी एवढी घाई का केली? असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

हक्कभंगाचा प्रस्ताव
या ट्रायलमुळे स्थानिक आमदार आणि खासदारांच्या हक्कांवर गदा आली आहे. मेट्रोची प्रशासकीय ट्रायल असेल तर त्यासाठी शरद पवार कशासाठी? उलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प थांबला आहे. मेट्रो कंपनीवर आमदार आणि खासदारांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

First Published on: January 18, 2022 4:55 AM
Exit mobile version