पुणे मेट्रोला मुहूर्त मिळाला हो! एप्रिलपासून पहिला टप्पा सुरू!

पुणे मेट्रोला मुहूर्त मिळाला हो! एप्रिलपासून पहिला टप्पा सुरू!

पुणेकर अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत असलेल्या पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील संत तुकाराम नगर ते फुगेवाडी या पाच किमी टप्प्याचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून तो प्रवाशांच्या सेवेत खुला करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. तसेच, वनाज-रामवाडी मार्गिकेतील आनंद नगर ते गरवारे हा पाच किमीचा टप्पा देखील जून अखेरपर्यंत पूर्ण करून जुलै महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. राज्याच्या विविध शहरांमध्ये महा मेट्रोच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, संचालक सुब्रमण्यम रामनाथ, कार्यकारी संचालक एन. एम. सिंग आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे मेट्रोचे काम वेळापत्रकानुसार प्रगतीपथावर असून मार्च २०२२ पर्यंत संपूर्ण ३२.५० किमी मार्गावर, दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सुरू होईल, असे बैठकीत सांगण्यात आले. मेट्रोच्या कामाबाबत यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेळापत्रकापूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.

नागपूर मेट्रोचे लवकरच उद्घाटन

दरम्यान, नागपूर मेट्रोच्या लोकमान्य नगर ते सीताबल्डी या ११ किमी मार्गाचे काम पूर्ण झाले असून लवकरच या मार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल, असे देखील याविषीय सांगताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

ठाणे अंतर्गत मेट्रोला गती

ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाच्या डीपीआरला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. परंतु, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लाइट मेट्रोच्या पर्यायाचा स्वीकार करून त्यानुसार नव्याने डीपीआर बनवण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत ब्रजेश दीक्षित यांनी दिली. फेब्रुवारी अखेरपर्यंत हा डीपीआर शासनास मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच नाशिक निओ मेट्रोच्या संदर्भातही तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

First Published on: January 14, 2020 8:29 PM
Exit mobile version