सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ३६ जणांवर धडक कारवाई

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ३६ जणांवर धडक कारवाई

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ३६ जणांवर कारवाई

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. याचअंतर्गत गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौचास बसणे, रस्त्यावर घाण करणे, उघडयावर लघवी करणे यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे अधिकारी कारवाई करत आहेत. आतापर्यंत एकूण १४ हजार रुपयांची दंडात्मक करावी केली गेली आहे. यात सार्वजनिक रस्त्यांवर थुंकणाऱ्या ३६ जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून ५ हजार ४०० रुपये दंड वसुल केला आहे.

या गोष्टींमुळे करण्यात आली कारवाई

गेल्या दोन दिवसांपासून शहरात आरोग्य विभागाचे पथक महानगर पालिकेच्या आठ प्रभागात फिरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, रस्त्यावर घाण टाकणे अशाविविध गोष्टी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर घाण टाकणाऱ्या ३४ जणांवर दंडात्मक कारवाई करत ७ हजार ९४० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर उघड्यावर लघुशंका करणाऱ्या ६ जणांवर कारवाई करत १ हजार २०० रुपये दंड केला आहे. ही कारवाई सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत महानगर पालिकेच्या आठ ही प्रभागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.

ही आहे दंडाची रक्कम

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रुपये दंड
रस्त्यावर घाण टाकल्यास १८० रुपये दंड
सार्वजनिक ठिकाणी लघवी केल्यास २०० रुपये दंड
उघड्यावर शौचास बसल्यास ५०० रुपये दंड

दंड न भरल्यास पोलिसात तक्रार दाखल करणार

एखाद्या व्यक्तींने दंड न भरल्यास यासंबंधी पोलिसात तक्रार दिली जाऊ शकते अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. आरोग्य अधिकारी करत असलेली कारवाई योग्य असून अधिक कडक करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. याचे सर्व सामान्य नागरिकांकडून स्वागत केलं जातं आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवत सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकताना नागरिकांना विचार करावा लागत आहे.

 

First Published on: November 20, 2018 4:31 PM
Exit mobile version