पुण्यात शांततापूर्ण विसर्जनाचा पोलिसांनी बांधला चंग!

पुण्यात शांततापूर्ण विसर्जनाचा पोलिसांनी बांधला चंग!

पुण्यात गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

लाडक्या गणरायाच्या आगमनाची जेवढी जास्त उत्सुकता असते, तेवढीच, किंबहुना त्याहून जास्त तयारी त्याच्या विसर्जनाची असते. यात सर्वात जास्त तयारी करावी लागते ती प्रशासनाला. पुण्यातला गणेशोत्सव अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असून शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही यंदा गणेशोत्सवाचा दांडगा उत्साह दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणमधील सर्वच तालुक्यांमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यातच, डीजेच्या नव्या वादामुळे पोलीस अधिकच सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या विसर्जनासाठी पोलिसांनी कंबर कसली असून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

सर्वच तालुक्यांमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त!

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हद्दीत एकूण २०८५ सार्वजनिक गणपती मंडळे असून शिरूर, जेजुरी, बारामती, जुन्नर, दौंड, आळेफाटा या ठिकाणी १०० पेक्षा जास्त गणपती मंडळे आहेत. संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यातील गणपती विसर्जनाचा कार्यक्रम शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील १ पोलीस अधीक्षक, २ अप्पर पोलीस अधीक्षक, १० पोलीस उपाधीक्षक, २०० पोलीस अधिकारी, २३ पोलीस कर्मचारी, १००० होमगार्ड, ६०० विशेष पोलीस अधिकारी, १ एस आर पी एफ प्लाटून, १० स्टाइल किंग फोर्स, ४ दंगल विरोधी पथके अशा पद्धतीने चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – पुण्यात आवाज वाढव डीजे, नाहीतर विसर्जन नाही!


७ हजाराहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गणपती विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आधीच जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये भारतीय दंड संविधान (सीआरपीसी) कलम १०७ प्रमाणे एकूण १५०० लोकांवर कारवाई करण्यात आलेली असून सीआरपीसी ११० प्रमाणे १७० तर सीआरपीसी १४४ प्रमाणे ५१४ लोकांना जिल्ह्यातून बाहेर काढण्यात आलेले आहे. सीआरपीसी १५१(३) प्रमाणे ५ लोकांवर तसेच मुपोकाक ५५ प्रमाणे ७१, ५६ प्रमाणे ३०, ५७ प्रमाणे ४० लोकांना तडीपार करण्यात आलेले आहे. तसेच सीआरपीसी १४९ प्रमाणे १६३०, मुपोकाक ९३ प्रमाणे ७२ अशा एकूण ४०३१ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ड्रोन कॅमेरे

गणपती विसर्जन कार्यक्रम शांततेने पार पाडण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शूटिंग केली जाणार आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये लाऊड स्पीकर व व्हिडिओ कॅमेरे पुरविण्यात आलेले असून सर्व गणपती मंडळांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. याशिवाय सर्व गणपती मंडळांना डीजे सिस्टीमचा वापर करू नये, याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. जर कोणी त्या सूचनांचे पालन न करता लाऊडस्पीकरची ध्वनीक्षमता वाढवली, तर व्हॉईस मीटरद्वारे ध्वनीमापन करून सदर गणपती मंडळावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत.

शांततापूर्ण सांगतेचा पोलिसांचा विश्वास!

दरम्यान, गणपतीच्या कालावधीमध्ये मोहरम व सात दिवसांच्या गणपती विसर्जन हा कार्यक्रम एकत्र येऊन सुद्धा पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिक, ग्रामसुरक्षा दल तसेच पोलिस मित्रांच्या सहकार्यामुळे गणेशोत्सव अतिशय शांततेत पार पडला असून आता शेवटी दहा दिवसांचा गणपती विसर्जन हा कार्यक्रम देखील शांततेत पार पडेल, असा विश्वास पोलीस दलाकडून व्यक्त केला जात आहे.


हेही वाचा – श्रीमंत दगडूशेठ हलवाईला १२६ किलोच्या मोदकाचा नैवेद्य!

First Published on: September 22, 2018 9:20 PM
Exit mobile version