मराठेंच्या अटकेवरुन शरद पवारांची गृहखात्यावर टीका

मराठेंच्या अटकेवरुन शरद पवारांची गृहखात्यावर टीका

शरद पवार (फाईल फोटो)

महाराष्ट्र बँकेविषयी पोलिसांनी गडबड केली आहे. बँकेशी संबंधित अपहार हे रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येतात. पुण्याचे पोलीस अधिकारी जरा जास्तच कार्यक्षम दिसत असल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांना दिलेल्या कर्जप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे व अन्य चार अधिकाऱ्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी पुणे पोलिसांच्या आततायी भूमिका आणि एकूणच गृहखात्याच्या कारभारावर टीका केली. या अटक प्रकरणी आम्ही भूमिका घेऊ पण याबाबत निर्णय घेणाऱ्या लोकांशी आधी चर्चा करू, असे पवार म्हणाले.

जेटलींच्या हिटलरशाहीच्या ब्लॉगवर टीका

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या ब्लॉगमध्ये, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीवर टीका केली आहे. इंदिराजींनी राज्यघटनेचा विकृत वापर करुन देशाच्या लोकशाहीत घराणेशाहीची मुहूर्तमेढ रोवली असून त्यांनी हिटलरलाही मागे टाकले, असा उल्लेख केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, या लोकांना आत्ताच आणीबाणी का आठवत आहे? गेल्या ४४ वर्षानंतर या विषयाला उकरुन काढण्यामागे काय कारण? मागच्या चार वर्षांतील आपले अपयश झाकण्यासाठीच असे विषय काढले जात असल्याचे पवार यांनी सांगितले.

आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते. परिषदेच्या शाहू अॅकडमीतील ३७० पैकी १२४ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. पुण्याप्रमाणेच औरंगाबाद, नागपुर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई या भागात अशी सेंटर सुरु करण्यात यावेत. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी पुण्यात यावे लागू नये यासाठी शैक्षणिक संस्थानी पुढे येण्याचे आवाहन पवार यांनी केले.

First Published on: June 26, 2018 9:59 PM
Exit mobile version