पुणे विद्यापीठाची ‘ही’ ऐतिहासिक परंपरा मोडणार

पुणे विद्यापीठाची ‘ही’ ऐतिहासिक परंपरा मोडणार

Convocation ceremony

दीक्षांत समारंभात इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेल्या गाऊनचा त्याग करण्याचा ऐतिहासिक निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. पुणे विद्यापीठातील दीक्षांत समारंभातून गाऊन हद्दपार होऊन यापुढे भारतीय पोशाख वापरण्यात येणार आहे. यापुढे कुर्ता, पायजमा आणि उपरणे असा दीक्षांत समारंभाचा पोशाख असणार आहे. येत्या ११ जानेवारीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ होणार आहे. दीक्षांत समारंभात काळी टोपी आणि काळा गाऊन घातला जात होता. भारत स्वतंत्र होऊन ही इंग्रजांच्या पोशाखाचा वापर केला जात होता. यामध्ये बदल केला असून यापुढे भारतीय पोशाष दीक्षांत समारंभात वापरला जाणार असल्याची माहिती पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन एस उमराणी यांनी दिली आहे.

अमरावती विद्यापीठाचा निर्णय

याआधी महाराष्ट्रातील अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभात इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेल्या गाऊनचा त्याग करण्यात आला होता. अमरावती विद्यापीठाने हा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता पुणे विद्यापीठाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. इंग्रजांच्या काळापासून चालत आलेल्या गाऊन आणि टोपीचा त्याग करण्यात आला. अमरावती विद्यापीठात दीक्षांत समारंभात कुलगुरू आणि मुख्य अतिथींचा पोशाख त्यांच्या आवडी प्रमाणे राहणार असून पुरुष वर्गासाठी पांढरा जोधपुरी सूट आणि काळे बूट तर महिलांकरिता काठाची पांढरी साडी आणि ब्लाउज अशी वेशभूषा असणार आहे.

गाऊनमुळे गडकरींना आली भोवळ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दीक्षांत समारंभावेळी अचानक चक्कर आली. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावेळी ही घटना घडली होती. राष्ट्रगीत सुरु असताना अचानक त्यांना चक्कर आली. शेजारी उभे असलेले राज्यपाली सी विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. नितीन गडकरी यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. गडकरींनी या समारंभावेळी घातलेल्या गाऊनमुळे त्यांना गुदमरल्यासारखे झाले आणि चक्कर आली असल्याचे त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, गडकरींना चक्कार आल्यानंतर दीक्षांत समारंभाचा पोशाख बदलला जात असल्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

First Published on: January 1, 2019 4:05 PM
Exit mobile version