Lok Sabha 2024 : इटलीच्या सुनेचा स्वीकार करणाऱ्यांनी बारामतीची सुन बाहेरची म्हणणं शोभतं का? भाजप महिला नेत्याचा सवाल 

Lok Sabha 2024 : इटलीच्या सुनेचा स्वीकार करणाऱ्यांनी बारामतीची सुन बाहेरची म्हणणं शोभतं का? भाजप महिला नेत्याचा सवाल 

इटलीच्या सुनेचा स्वीकार करणाऱ्यांनी बारामतीच्या सुनेला बाहेरची म्हणणं शोभतं का, असा टोला भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता शायना एनसी यांनी लगावला

पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहात आहेत. शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या उमेदवार या बाहेरच्या आहेत, म्हटल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह भाजपचे नेतेही पवारांवर निशाणा साधत आहेत. इटलीच्या सुनेचा स्वीकार करणाऱ्यांनी बारामतीच्या सुनेला बाहेरची म्हणणं शोभतं का, असा टोला भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता शायना एनसी यांनी लगावला. पुण्यातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस – महायुतीच्या बारामतीमधील उमेदवार सुनेत्रा पवार या चाळीस वर्षांपासून अजित पवार यांच्या बरोबरीने सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. सुनेत्रा पवारांनी टेक्स्टाईल इंडस्ट्री, शिक्षण, आर्थिक क्षेत्रात काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वातील कंपनीमध्ये 15 हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांच्या संस्थांमध्ये महिलांना सन्मान मिळत आहे. अशा महिलेला गृहिणी कसे म्हणता येईल, असा सवाल शायना एनसी यांनी उपस्थित केला.

महिलांनी राजकारणात आलं पाहिजे असं सर्वच म्हणतात. मग एक गृहिणी राजकारणात येऊ शकत नाही का, असा सवाल उपस्थित करत शायना एनसी म्हणाल्या की, सुनेत्रा पवार याविविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात कित्येक वर्षांपासून सक्रीय आहेत. पर्यावरण विषयक संघटनेच्या त्या सदस्य आहेत. बारामती हायटेक टेक्स्टाईलच्या माध्यमातून 15 हजार लोकांना त्यांनी रोजगार दिला आहे. जमीनीवर काम करणाऱ्या त्या कार्यकर्त्या आहेत. अशा महिलेला प्रोत्साहन देणे आणि त्यांना लोकसभेत पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे लुटियन्स दिल्लीच्या – शायना एनसी

खासदार सुप्रिया सुळेंचे नाव न घेता शायना एनसी म्हणाल्या की, फक्त कोणाची तरी मुलगी आहे म्हणून मला निवडून द्या म्हणणाऱ्या काही आहेत. तर दुसरीकडे जमीनीवर काम करणाऱ्या महिलाचा पर्याय बारामतीकरांसमोर उपलब्ध आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काम करणारं कोण आहे आणि लुटियन्स दिल्लचं कोण आहे, याचं उत्तर तुम्हाला बारामतीची जनता देईल, असं एका प्रश्नाच्या उत्तरात शायना एनसी म्हणाल्या.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि…, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर पलटवार

बारामतीमध्ये सुरु असलेली नणंद विरुद्ध भावजय लढत देशात चर्चेचा विषय झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी भाजपचे नेतेही आता बारामती आणि पुण्यात ठाण मांडून आहेत. याच मालिकेत शायना एनसी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की जर इटलीची सुन तुम्हाला चालते. इटलीच्या सुनेचा तुम्ही स्वीकार केला, तर बारामतीची सुन बाहेरची आहे, हे म्हणणं तुम्हाला शोभतं का? जेव्हा एक महिला लग्न करुन तुमच्या घरात येते. सक्रीय पद्धतीने सामाजिक क्षेत्रात काम करते. अशा महिलेला काम करण्याची संधी दिली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Edited By – Unmesh Khandale 

First Published on: May 2, 2024 6:49 PM
Exit mobile version