स्थानिक संस्थांमध्येही आता शिवशक्ती-भीमशक्तीची युती, शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित आघाडीत प्रवेश

स्थानिक संस्थांमध्येही आता शिवशक्ती-भीमशक्तीची युती, शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित आघाडीत प्रवेश

राज्यातल्या शिवशक्ती-भीमशक्तीचा फॉर्म्यूला पुण्यातही राबवला जाणार असल्यानं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत रंजक चित्र पहायला मिळणार आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची काही दिवसांपूर्वी युती झाली आहे. युती झाल्यानंतर राज्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचं सेलिब्रेशनंच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर युती झाल्यानंतर राज्यातील स्थानिक संस्थांमध्येही शिवशक्ती आणि भीमशक्ती शिवसेना एकत्रित येऊन कारभार पाहणार आहेत. ज्याठिकाणी भाजपने अन्य पक्षांची मदत घेऊन सत्ता मिळवली, तिथेही सेनेला सोबत घेतले जाईल. पुण्यातही हा फॉर्म्युला असेल, तसेच पुढील महापौर वंचित व शिवसेना युतीचा असेल, अशी भूमिका शाखा अनावरण वेळी शहराध्यक्ष मुन्नवर भाई कुरेशी यांनी मांडली.

पुण्यातल्या हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४७ कोंढवा येवलेवाडी येथील सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख नवनीत अहिरे, सुरेश गायकवाड व प्रमोद जाधव यांच्या सहकार्याने हा भव्य पक्ष प्रवेश पार पडला. तसंच वंचित बहुजन आघाडीच्या शाखेच्या नाम फलकाचे अनावरण शहराध्यक्ष मुन्नवर भाई कुरेशी व शिवसेना नगरसेविका संगीताताई ठोसर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भीमशक्ती आणि शिवशक्तीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. तसंच एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी युतीचा आनंदोत्सव साजरा केला.

वंचित बहुजन आघाडीच्या शाखाही उभारू लागल्या…

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीनंतर आता स्थानिक पातळीवरही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पुण्यातल्या पर्वती मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४८ अप्पर इंदिरानगर, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील बोपोडी विभागासह ठिकठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या शाखाही उभारू लागल्या आहेत. पुण्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताकद दाखविण्यासाठी वंचित बहुजन आघाने दंड थोपाटले आहेत. त्यामुळे राज्यातल्या युतीचा फॉर्म्यूला पुण्यातही राबवला जाणार असल्यानं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत रंजक चित्र पहायला मिळणार आहे.

First Published on: January 27, 2023 7:31 PM
Exit mobile version