Coronavirus: क्वारंटाइनच्या शिक्क्यामुळे हातावर जखमा; अनेकांनी ट्विट केले फोटो

Coronavirus: क्वारंटाइनच्या शिक्क्यामुळे हातावर जखमा; अनेकांनी ट्विट केले फोटो

आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलेला फोटो

राज्यात सध्या कोरोनाच्या संकट असून, येत्या काळात मुंबई-पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. याचमुळे आता मुंबई-पुण्यात अडकलेले चाकरमानी आपल्या मूळ गावी म्हणजे कोकणात मोठ्या संख्येने जाऊ लागले आहेत. कोकणात जाण्यासाठी रितसर परवानगी घेऊनही अनेकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच आता कोकणात गेलेल्या काही चाकरमान्यांच्या हातावर मारलेल्या क्वारंटाइनच्या शिक्क्यामुळे त्यांच्या हातावर फोड येऊन इजा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. बऱ्याच चाकरमान्यांनी सोशल मीडियावर फोटो टाकून सरकारी यंत्रणेचा निषेध केला आहे. दरम्यान या प्रकारावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली असून, सरकारचे काम हे लोकांना दुखवणारे असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

देवगडमधील तरुणीला झाला त्रास

खारेपाटण सिंधुदुर्ग सीमेवर देवगड येथे राहणाऱ्या एका मुलीच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारला गेला. मात्र त्या तरुणीच्या हातावर जो शिक्का मारला गेला त्यासाठी जी शाई वापरण्यात आली ती निवडणुकीच्या काळात वापरण्यात येणारी शाई वापरली गेल्याचा आरोप होऊ लागला आहे. यामुळे दुसऱ्या दिवशी या तरुणीचा हात सुजला आणि तिच्या हातावर फोड देखील आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बाब भाजप आमदार नितेश राणे यांच्या लक्षात येताच त्यांनी हाताला फोड आलेला फोटो स्वतःच्या ट्विटवर टाकला. त्यानंतर त्यांच्या ट्विटखाली अनेकांनी आपल्या हातावर मारलेल्या शिक्क्यामुळे त्वचेचा त्रास झाल्याचे सांगत फोटो पोस्ट केले आहेत.

 

 

 

जिल्ह्यातील शिक्षकही लागले कामाला

मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या मदतीने क्वारंटाइनसाठी जागा उपलब्ध करून दिल्या जात असून, सध्या गावामध्ये शाळा, हायस्कुल, गावातील एखादे मोकळे घर या ठिकाणी लोकांची त्या त्या गावात व्यवस्था करण्यात येत असून, यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना देखील कामाला लावले असून, शिक्षक सध्या शाळेमध्ये सकाळी १० ते ५ ड्युटी करत शाळेमध्ये पहारा देत आहेत.

विशेष म्हणजे सकाळी १० ते ५ शिक्षक हे शाळा हायस्कुलमध्ये पहारा देत असून, रात्री कोण शाळेत थांबणार यावरून सध्या कोकणात वाद विवाद सुरू असून, शिक्षकांनीच २४ तास शाळेमध्ये थांबावे असे सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे अवघ्या दोन ते तीन दिवसात मुंबईतून कोकणात परतलेल्या चाकरमान्यांमुळे स्थानिक प्रशासनाची पुरती दमछाक उडाली असून, जर चाकरमान्यांचे प्रमाण वाढले तर त्यांच्या क्वारंटाइनची व्यवस्था तरी कुठे करायची हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तर काही गावामध्ये अजूनही मुंबईकराना गावी घेण्यास विरोध होत असल्याचे समोर येत आहे.

First Published on: May 16, 2020 8:55 PM
Exit mobile version