बिल्डरांच्या प्रश्नांसाठी आता क्विक रिस्पॉन्स विंडो

बिल्डरांच्या प्रश्नांसाठी आता क्विक रिस्पॉन्स विंडो

विकासकांच्या समस्या सोडविण्यासाठी क्विक रिस्पॉन्स विंडो(शीघ्र प्रतिसाद) स्थापन करण्यात येणार असून त्याअंतर्गत सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे विकासकांच्या क्रेडाई- नेरेडको संस्थेसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी राज्यशासन विकासकांच्या समस्या सोडविण्यासाठी तयार आहे. मात्र विकासकांनी देखील स्वतःसाठी आचारसंहिता घालून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

गृहनिर्माण क्षेत्राला आज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासन आणि विकासक यांनी टीमवर्क म्हणून काम केले तरच ह्या अडचणींवर आपण मात करू शकू. रोटी ,कपडा और मकान देणे ही सरकारची जबाबदारी आहे. प्रत्येक झोपडपट्टीवासियाला त्याच्या हक्काचे घर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना कशामुळे रखडल्या याची वर्गवारी करण्यात येईल आणि त्या संबंधात धोरण ठरवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. रेडिरेकनरप्रमाणे असलेली किंमत जागेच्या खर्‍या किंमतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे रेडीरेकनरची किंमत जागेच्या खर्‍या किंमतीपर्यंत आणण्याची गरज आहे.

यासाठी बांधकाम क्षेत्राऐवजी चटई क्षेत्रावर रेडीरेकनरची किंमत आणावी लागेल तरच घरांच्या किमती कमी होऊ शकतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गृहनिर्माण क्षेत्राची परिस्थिती सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील असून विकासकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल,असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले,गृहनिर्माण क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी गेल्या महिन्याभरात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि झोपडपट्टी पुनर्वसनाच्या अनेक योजना आता मार्गी लागल्या आहेत. गरिबांना परवडणारी घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध असून चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचारी आणि पोलिसांना म्हाडामध्ये दहा टक्के घरे राखीव ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

यांची समिती गठीत

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे , परिवहन मंत्री अनिल परब, राज्याचे मुख्य सचिव ,नगरविकास, महसूल, अर्थ खात्यांचे प्रधान सचिव, मुंबई व ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, म्हाडाचे उपाध्यक्ष व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विकासकांच्या नेरेडको संस्थेचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी , राजन बांदलेकर, नयन शाह, शाहिद बलवा, बोमन ईराणी, अजय अशर, विनोद गोएंका, डॉमनिक रोमेल आणि दिलीप ठक्कर.

First Published on: February 12, 2020 5:58 AM
Exit mobile version