देवळाली गावात शिंदे-ठाकरे गटात राडा; गोळीबार झाल्याने तणावाचे वातावरण

देवळाली गावात शिंदे-ठाकरे गटात राडा; गोळीबार झाल्याने तणावाचे वातावरण

नाशिक : शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या देवळाली गावात गुरुवारी (दि.१९) सायंकाळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या सर्वपक्षीय बैठकीत शिंदे गट व ठाकरे गटात मोठा राडा झाला. यावेळी अज्ञात व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याने तणावमय परिस्थिती निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह गुन्हे शाखेच्या पोलिसांसह नाशिकरोड, उपनगर व देवळाली कॅम्प पोलिसांनी देवळाली गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. उपनगर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.

देवळाली गाव शिवजन्मोत्सव समितीची सर्वपक्षीय बैठक गुरुवारी (दि.१९) रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सूर्यकांत लवटे, उदय थोरात, नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा लवटे, अस्लम मनियार, बंटी कोरडे, योगेश गाडेकर यांच्यासह युवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी निवड व इतर कारणावरुन शिंदे गट व ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या बाचाबाचीचे किरकोळ हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी अज्ञात युवकाने हवेत गोळीबार केल्याचे वृत्त आहे.

या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, उपनगर पोलीस ठाण्याचे निलेश माईनकर, नाशिकरोडचे अनिल शिंदे व देवळाली कॅम्पचे कुंदन जाधव यांच्यासह दंगा नियंत्रण पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून, तपासानंतर गुन्हा दाखल होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माईनकर यांनी सांगितले.

First Published on: January 20, 2023 2:07 PM
Exit mobile version