सुशांतसिंह मृत्यूप्रकरण : आदित्य ठाकरेंवर राहुल शेवाळेंचे लोकसभेत गंभीर आरोप

सुशांतसिंह मृत्यूप्रकरण : आदित्य ठाकरेंवर राहुल शेवाळेंचे लोकसभेत गंभीर आरोप

नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण (Sushant singh Rajput Ddeath Case) आता थेट लोकसभेत पोहोचले आहे. सीबीआयचा अहवाल आल्यानंतरही खासदार राहुल शेवाळे यांनी याप्रकरणी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहे. ‘सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाच्या फोनवर एयू नावाने ४४ कॉस आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव असं बिहार पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे,’ अशी माहिती शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत सादर केली. त्यामुळे याप्रकरणातील खरी माहिती केंद्रीय यंत्रणांनी सार्वजानिक करावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. शिवसेनेतील (शिंदे गट) नेत्यानेच शिवसेना पक्षप्रमुख आणि त्यांच्या मुलावर आरोप केल्याने आता राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटणार आहे.

लोकसभेत आज अंमलीपदार्थविरोधातील धोरणांवर चर्चा सुरू होती. या चर्चेत राहुल शेवाळे यांनीही सहभाग घेतला. याच मुद्द्यांवर त्यांनी ड्रग्सविरोधी कारवाई फक्त सेलिब्रेंटीविरोधात होते, इतर प्रकरणात कारवाई होत नाही असा दावा केला. तसंच, सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही ड्रग्सचा मुद्दा उपस्थित झाला होता. या प्रकरणाची चौकशी एनसीबीसह सीबीआयकडून केली जात आहे. सीबीआयची चौकशी कुठवर आली आहे? सुशांतच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या का? बिहार पोलिसांनी सांगितल्याप्रकारे रियाला आदित्य उद्धव ठाकरेंचा फोन आला होता का याबाबत प्रश्न विचारले आहेत.

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाची चौकशी तीन पातळ्यांवर झाली. मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयकडून याप्रकरणाची चौकशी झाली. मात्र, तिन्ही यंत्रणांकडून आलेल्या अहवालात तफावत आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला एयू नावाने ४४ कॉल आले होते. या ‘एयू’बाबत मुंबई पोलिसांनी वेगळा अहवाल दिला होता. तर, बिहार पोलिसांनुसार ‘एयू’ म्हणजे ‘आदित्य उद्धव’ आहे. सीबीआयने एयूबाबत अहवाल दिलेला नाही. त्यामुळे रिया चक्रवर्तीला  कॉल केलेला एयू नक्की कोण याची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे.

लोकसभेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळीही त्यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी केंद्रीय यंत्रणांकडे केली आहे. तसंच, आपला कोणावरही आरोप नसून चौकशी अहवालातून जे समोर आलंय ती माहिती सभागृहात सादर केली आणि त्यानुसारच या प्रकरणाची माहिती मागवण्यात आली आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.

First Published on: December 21, 2022 4:55 PM
Exit mobile version