Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन मिशन योजनांची झाडाझडती

Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन मिशन योजनांची झाडाझडती

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची झाडाझडती घेताना गटविकास अधिकारी

दीपक पाटील : आपलं महानगर वृत्तसेवा

नेरळ : जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चूनही महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरलेला नाही. कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईचे हे दाहक वास्तव ‘आपलं महानगर’ने ‘पाण्याची बोंबाबोंब’ या मालिकेतून दाखवून दिले. त्यानंतर कर्जत पंचायत समितीने बातम्यांची दखल घेत जलजीवन मिशन योजनेचा आढावा घ्यायला सुरुवात केली असून गटविकास अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांना तंबी देण्यात आली. तसेच पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना मुदत दिली आहे. यामुळे तहानलेल्या कर्जतकरांनी ‘आपलं महानगर’चे आभार मानले आहेत. (Aaple Mahanagar Impact)

जलजीवन मिशन योजना राबवताना ठेकेदारांकडून अनेक त्रुटी राहिल्या. काही ठिकाणी योजना अपूर्ण आहेत तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले. अनेक गावांमध्ये तर जलवाहिनी जमिनीखाली वरवर टाकल्याने त्या फुटत आहेत. परिणामी योजना फसल्या आणि लोकांना ऐन कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. (Raigad Water Crisis)

आता कर्जत पंचायत समिती तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या योजनेची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी ठेकेदारांना सक्त सूचना देत ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणे सहन केले जाणार नाही, असे सुनावत ठेकेदारांना योजना पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले. आहे. (Jaljeevan Mission Yojana)

जलजीवन योजना राबवण्यात आल्याने पाणीटंचाई आराखड्यात गावांचा समावेश केला जात नाही. त्यामुळे ना जलजीवनचे पाणी ना टँकरने पाणीपुरवठा, अशी विचित्र परिस्थितीत अनेक ग्रामस्थांची कोंडी झाली आहे. कर्जत तालुक्यात जलजीवन मिशनच्या ११९ योजना राबवण्यात आल्या. २०२१ पासून सुरू झालेल्या या योजना बहुतांश ठिकाणी अजूनही सुरूच आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून या योजनांवर देखरेख केली जाते. मात्र या विभागातील कमी मनुष्यबळामुळे ठेकेदारांचे देखील फावले आहे. त्यामुळे तालुक्यात बहुतांश जलजीवन मिशनच्या योजना रेंगाळल्या आहेत. (Jaljeevn Mission)

कर्जत तालुक्यात डोंगर, दुर्गम भाग असल्याने उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसतात. त्यामुळे पाणीटंचाईवर तात्पुरती मात करण्यासाठी प्रशासन टँकरचा आधार घेते. दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून त्यावर सरकार कोट्यवधींचा खर्च करते. त्यावर उपाय म्हणून जलजीवन मिशन योजनांना मान्यता मिळाली. पण या योजनाही अनेक ठिकाणी फसल्या, अनेक ठिकाणी पाण्याचे उद्धव आटल्याने महिलांच्या डोक्यावर पुन्हा पाण्याचे हंडे आले.

कर्जत तालुक्यातील चाफेवाडी, डामसेवाडी, गुडवन, वारे, विठ्ठलवाडी आदी अनेक गावांमधील योजनाचे वास्तव ‘आपलं महानगर’ने मांडले. याची गंभीर दखल घेत कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिल मेटकरी, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुजित धनगर, तालुका आरोग्य अधिकारी नितीन गुरव आदींनी कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनांचा आढावा घेतला.

या सर्वांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेव्हा यातील त्रुटी पाहून त्यांनी ठेकेदारांना धारेवर धरले. कर्जत तालुक्यातील कळंब, ओलमण खांडस, अंभेरपाडा, नांदगाव प्रभागातील टंचाईग्रस्त गावे दौरा करण्यात आला. या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी टँकर व्यवस्थित पाणीपुरवठा करतात का, यासह जलजीवन मिशन योजनेतील तक्रारींचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची झाडाझडती घेतली. योजनांमधील त्रुटी दूर करत ग्रामस्थांना पाणी मिळाले पाहिजे, असे ठणकावले. त्यासाठी आठवड्याची मुदत दिली आहे. त्यानंतर पुन्हा आठवड्यानंतर योजनांना आढावा घेतला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या या कडक भूमिकेमुळे जलजीवन मिशन योजनेला गती मिळून ग्रामस्थांचा पाण्याचा मार्ग सुकर होईल, असे चित्र आहे.

पुढील आठवड्यात पुन्हा आढावा

जलजीवन मिशनबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार आम्ही याबाबत तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात टँकरने पाणीपुरवठा, टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांतील लोकांशी चर्चा करत केल्या. तक्रारीप्राप्त आणि रखडलेल्या जलजीवन मिशन योजनांच्या कामांची पाहणी करून संबंधित ठेकेदार आणि यंत्रणांना कामांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच काम पूर्ण करण्यासाठी मुदत दिली. दिलेल्या सूचनांचे पालन केले की नाही हे पाहण्यासाठी पुढील आठवड्यात पुन्हा दौरा केला जाईल. – चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत

(Edited by Avinash Chandane)

First Published on: April 28, 2024 1:32 PM
Exit mobile version