अरे देवा! पुन्हा अवकाळी, ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, जाणून घ्या

अरे देवा! पुन्हा अवकाळी, ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, जाणून घ्या

गुलाबी थंडीनंतर उकाड्याचा उन्हाळा येणार या चिंतेत असतानाच राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी हलक्या सरींनी तर काही ठिकाणी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. मार्च महिन्यात आलेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मेहनतीने कष्ट करुन पिकवलेल्या सोन्यासारख्या धान्यावर पाणी सोडावं लागलं. शेतकऱ्यांना गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. असं असताना आणखी काही दिवस शेतकऱ्यांवर अवकाळीचं संकट घोंगावणार असल्याचं चित्र दिसतंय. कारण पुढील काही दिवस पुन्हा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.

महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर मराठवाड्यातही हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात गारपिठ आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यभरात सर्वत्र ऊन आणि नंतर ढगाळ वातावरण दिसून येत आहे. कोकण, गोवा, उत्तर-मध्य आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या पोषक हवामान स्थितीमुळे राज्यात पाऊस सुरू आहे. आज (दि. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात जोरदार वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

या अवकाळीमुळे शेतात पिकवायचं काय, कसं आणि कधी हा प्रश्नच शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय..त्यातच कर्मचाऱ्यांच्या संप सुरु असल्यानं नुकसानीचे पंचनामे कधी होणार हा प्रश्नही शेतकऱ्यांना पडलाय.

First Published on: March 19, 2023 12:23 PM
Exit mobile version