दिवाळीवर पावसाचे सावट

दिवाळीवर पावसाचे सावट

मुंबईसह राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी मुसळधार कोसळणार्‍या पावसाने दिवाळी काळोखून टाकली आहे. त्याचा परिणाम खरेदी-विक्री झाला असताना बाजारपेठांमधील गर्दी कमी झाली आहे. दिवाळीनिमित्त रस्त्यांवर विविध वस्तू विकणार्‍यांवर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यातच येत्या २७ ऑक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

मुुंबईसह राज्यात वरुणराजाने परतीचा प्रवास पूर्ण केला असला तरी गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रात्री जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई वगळता राज्यात पुणे, उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाने ढेरा टाकला आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळसणावर पावसाचे पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. राज्यात 27 ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी जाहीर केले आहे. तत्पूर्वी मुंबई वेधशाळेने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी-अधिक असेल. दरवर्षी गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार, अशी चिन्हे आहेत. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वार्‍यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत सतर्कतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्यात लांबलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला मका, बाजरी, ज्वारी, कपाशी पीक पूर्णपणे नष्ट झाले.

या पावसाचा द्राक्ष बागांना देखील मोठा फटका बसला. मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात कापणी केलेले भातपीक पुरते वाया गेले आहे. येत्या काही दिवसांपासून रायगडमध्ये गेली तीन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. परतीच्या या पावसामुळे शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेले भाताचे पिक धोक्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर भातशेती केली जाते. आता शेतातील भाताचे पिक कापणीसाठी तयार झाले असून काही अंशी कापणी झाली आहे. पण परतीच्या पावसाने रायगडमधील शेतकर्‍याची झोप उडवली आहे. गेली दोन दिवस संपूर्ण रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून यामुळे शेतातील भाताचे पिक पडले आहे तर कापणी झालेले भाताचे पिक शेतात भिजत आहे. यामुळे शेतकर्‍याची चिंता वाढली आहे.

First Published on: October 24, 2019 6:52 AM
Exit mobile version