राज दुसर्‍यांच्या लग्नात नाचतायत!

राज दुसर्‍यांच्या लग्नात नाचतायत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे

रताळ्याला म्हणतं केळं आणि लग्नात नाचतंय खुळं’ अशी आपल्याकडे म्हण आहे आणि तशी अवस्था मनसे प्रमुख राज ठाकरे यांची झाली आहे, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज यांना धारेवर धरले.

नांदेडमध्येच शुक्रवारी राज यांची सभा पार पडली होती. या सभेत राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. राज यांच्या टीकेला फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ’नांदेडच्या निवडणुकीत आता रंग भरला जात आहे. भाजपामुळे अशोक चव्हाण यांना लोक भाड्याने आणावे लागतं आहे. राज ठाकरे हे भाजपवर टीका करत आहे. यांचं असं झालं की, लग्न कुणाचं आहे आणि हे नाचताय. मुळात मनसे ही मतदार नसलेली सेना आहे.

असाही घणाघात फडणवीस यांनी केला राज यांनी फडणवीस यांच्यावर बसवलेला मुख्यमंत्री अशी टीका केली होती. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. ’राज म्हणाले हा बसवलेला मुख्यमंत्री आहेत. हो मला जनतेने बसवले आहे आणि याच जनतेनं तुम्हाला घरी बसवलं’ असा टोला लगावला. तसंच ’आधे इधर जाओ ,आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ’ पण मागे कुणीच नाही अशी राज ठाकरे यांची अवस्था झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

’मराठवाड्याचा वाळवंट आघाडी सरकारमुळे’राज ठाकरे म्हणाले मराठवाड्याचं वाळवंट झालं. अशोक चव्हाण उत्तर द्या, मराठवाड्याचं वाळवंट कोणी केलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या धोरणामुळे मराठवाड्याच वाळवंट केलं. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याच्या करार 2010 ला अशोक चव्हाण यांनी केला. मी तो करार रद्द केला आणि पाणी आणलं’, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

राजची प्रचारसभा, तावडेंचे निवडणूक अधिकार्‍यांना पत्र
राज ठाकरे महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. हा प्रचार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा आहे. मात्र सभांचा खर्च कोणत्याच उमेदवाराच्या निवडणूक खर्चात दाखवला जात नाही. ठाकरे यांच्या प्रचाराला परवानगी देण्यापूर्वी ते कोणत्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपकडून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांना लिहिले आहे.

निवडणूक आयोग काही करू शकत नाही
राज ठाकरेंची सभा कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी नसेल तर त्यात निवडणूक आयोग काहीही हस्तक्षेप करु शकत नाही. भाजपला तक्रार नेमकी कोणत्या मुद्द्यावर करायची हे आधी त्यांना ठरवावे लागेल, अशी माहिती माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली.

First Published on: April 14, 2019 6:21 AM
Exit mobile version