राज्यातले वाईन शॉप सुरू व्हायला हवेत, राज ठाकरेंचं सरकारला पत्र!

राज्यातले वाईन शॉप सुरू व्हायला हवेत, राज ठाकरेंचं सरकारला पत्र!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

राज्यात कोरोनामुळे १८ मार्चपासून टाळेबंदी सुरू आहे. उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्याचा मोठा आर्थिक फटका राज्य सरकारच्या तिजोरीला बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत राज्याला महसूल मिळवून देणारे वाईन शॉप्स सुरू करून राज्याला महसुलाचा ओघ सुरू होईल हे बघायला काय हरकत आहे? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी वाईन शॉप्ससोबतच हॉटेल, खानावळी देखील सुरू करण्याची मागणी केली आहे. राज्याच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घ्यावाच लागेल, असं त्यांनी नमूद केलं आहे.

काय आहे पत्रात?

राज ठाकरेंनी राज्य सरकारला हे पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये ते म्हणतात, ‘पार खडखडाट झालेल्या राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरू व्हावीच लागेल. १८ मार्चपासून टाळेबंदी आहे. पुढे किती दिवस ही परिस्थिती राहील याची खात्री नाही. अशा काळात किमान वाईन शॉप्स सुरू करून राज्याला महसुलाचा ओघ सुरू होईल हे बघायला काय हरकत आहे?’ या मुद्द्याला समजावून सांगताना पत्रात राज ठाकरे पुढे म्हणतात, ‘वाईन शॉप्स सुरू करा याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही. तर राज्याच्या महसुलाचा विचार करा हाच आहे. दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५ हजार कोटी मिळतात. गेल्या ३५ दिवसांपासून राज्य टाळेबंदीत असताना किती महसूल आपण गमावला आहे आणि किती गमावू याचा अंदाज येईल. वाईन शॉपमधून मिळणारा महसूल मोठा आहे आणि आत्ता राज्याला त्याची नितांत गरज आहे’.

‘राज्यात आधी दारूबंदी होती आणि आता ती महसुलासाठी उठवा असं कुणी म्हणत नाहीये. टाळेबंदीच्या आधीही दारूची दुकानं बंद सुरूच होती. त्यामुळे आता कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा. राज्याला महसुलाची गरज आहे हे वास्तव आता स्विकारलं पाहिजे’, असं देखील राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे.

First Published on: April 23, 2020 3:28 PM
Exit mobile version