मनसे सत्तेपासून दूर नाही; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास

मनसे सत्तेपासून दूर नाही; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास

संग्रहित छायाचित्र

ठाणेः मनसे सत्तेपासून दूर नाही, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील जाहिर सभेत कार्यकर्त्यांना गुरुवारी दिला. मनसेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

राज ठाकरे म्हणाले, भाजपला सत्तेत येण्यासाठी ६० वर्षे लागली. पक्ष चालवताना खस्ता खाव्या लागतात. पण आपण सत्तेपासून दूर नाही. आता जे काही यांचं सुरु आहे. ते बघता जनता त्यांच्या राजकारणाला कंटाळली आहे. आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. मी आड मार्गाने म्हणजे टिव्हीतून सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. पण तुम्हाला घराघरात जायचे आहे. मी तुमच्या विभागात सभा घेईनच. त्याआधी तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचे आहे, असा सल्ला राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

निवडणुका कधीही लागतील. आपल्याला सर्व महापालिका जिंकायच्या आहेत. निवडणुकांचं दहावीच्या परीक्षेसारखं झालं आहे. कधी लागणार निवडणुका, तर म्हणतात मार्चमध्ये. मार्च गेली की ऑक्टोबर. असं सर्व सुरु आहे. असं वाटतं दहावीच्या परीक्षेला बसलो आहे. पण आपली सत्ता येणार आहे. हे मी उगीच बोलत नाही. हे होणार आहे. भरती नंतर ओहोटी येत असते. त्यामुळे मनसे सत्तेपासून दूर नाही, असा विश्वास राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक होत आहे. या स्मारकात इतकी मोठी लायब्ररी उभारा की जगभरातील तत्त्वज्ञ येथे अभ्यासासाठी येतील. पुतळे उभारुन काही होत नाही. गल्लोगल्लीत डॉ. आंबेडकर. महात्मा फुले यांंचे पुतळे आहेत. त्यांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांनी काय कार्य केले याचा बोध घ्या. तरच आपण आयुष्यात काही तरी करु शकू, असेही राज ठाकरे यांनी सभेत सांगितले.

मनसेच्या सभेला गर्दी होते. पण मते मिळत नाहीत. हा प्रोपोगेंडा आहे. आपली सत्ता नसताना सभेला होणारी गर्दी हीच पक्षाची उर्जा आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

First Published on: March 9, 2023 9:04 PM
Exit mobile version